डोंबिवली- येथील सागाव भागातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मागील १२ वर्ष ते विश्वस्तांच्या सहकार्याने ट्रस्टचा कारभार पाहत आहेत. अध्यक्ष पदाच्या पाच वर्षामधील तीन वर्षाचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय दबाव तंत्राने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा भक्तगणांमध्ये सुरू आहे.
शिवसेना एकसंध असताना प्रकाश म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य अशी अनेक पदे उपभोगली आहेत. कल्याण ग्रामीण शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा कारभार इतर विश्वस्तांच्या सहकार्याने त्यांनी १२ वर्ष सांभाळला. अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मंदिराच्या माध्यमातून राबविण्यासाठी ते आघाडीवर होते. शिवसेनेचा कल्याण ग्रामीण मधील उमेदवार निवडून आणण्याचे नियोजन त्यांच्याकडे असायचे. शांत, संयमित आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली : रस्ते ‘के.डी.एम.सी’चे आणि झाकणे ‘बी.एम.सी’ची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्या काही समर्थकांनी शिवसेने सोबत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राहणे पसंत केले. म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून विविध प्रकारची आयुधे, दबावतंत्र शिंदे समर्थकांकडून वापरण्यात आली. गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीत कोणत्याही दबावतंत्राला बळी न पडता. आमची निष्ठा शिवसेनाप्रमुखांच्याच चरणी, या बाण्याने प्रकाश म्हात्रे आणि समर्थक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत आहेत. या गोष्टीची चिड शिंदे समर्थकांना आहे.
त्यामुळे म्हात्रे यांच्या मार्गात जेवढे अडथळे आणता येतील असे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. या अडथळ्यांमधून होणाऱ्या त्रासातून मुक्त राहण्यासाठी प्रकाश म्हात्रे यांनी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
मंदिर ट्रस्टवर ११ सदस्य आहेत. त्यामध्ये शिंदे समर्थक तीन सदस्य आहेत. म्हात्रे हे स्वता ठाकरे समर्थक असल्याने मंदिरा संदर्भातील काही विकास कामे मार्गी लावताना आपण शिंदे गटात प्रवेश करत नसल्याने अडथळे येत असल्याची जाणीव म्हात्रे यांना होत होती. आपण शिंदे गटात जाणार नाही या विषयावर म्हात्रे ठाम आहेत. मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी असल्याने आपला अध्यक्ष पदाचा अडसर मंदिराच्या विकास कामात नको म्हणून म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा इतर विश्वस्त, भक्तगणांमध्ये आहे.
हेही वाचा >>> लाचखोर स्वच्छता निरीक्षक अटकेत; महिनाभरात अंबरनाथ पालिकेचा दुसरा कर्मचारी जाळ्यात
म्हात्रे हे राजीनाम्याविषयी विस्तृत बोलत नसले तरी, राजकीय दबाव हेच त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्या मागील मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. कल्याणमध्ये ठाकरे समर्थक जिल्हाप्रमुख विजय साळवी, डोंबिवलीत जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, माजी आ. सुभाष भोईर असे जुने म्होरे शिंदे गटात यावेत यासाठी विविध प्रकारच्या खेळी प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू असल्याचे कळते.
“श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराची १२ वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. विश्वस्त, भक्तगणांची चांगली साथ मिळाली. व्यक्तिगत कारणामुळे आपण राजीनामा दिला आहे.”
प्रकाश म्हात्रे शिवसैनिक, ठाकरे समर्थक.