ठाणे : उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पक्षावर लादण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत असतानाच, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा आरोप खोटा असल्याचा दावा केला आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडुण आल्यानंतर प्रकाश परांजपे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्षही नव्हते, असे सांगत आनंद यांनी या भेटीचे जुने छायाचित्र दाखवून या दोन्ही नेत्यांनाही उद्धव यांचे नेतृत्व मान्य होते, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> येऊरचे बंगले वाचविण्यासाठीच माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश; राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा आरोप
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेत उभी फुट पडून दोन गट तयार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगला आहे. खरी शिवसेना कुणाची आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार कोण, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद रंगला आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पक्षावर लादण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून होऊ लागले असून उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी आता शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे धावून आले आहेत.
हेही वाचा >>> ‘किती हे सुडाचे राजकारण…’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी केलेलं ट्वीट चर्चेत; ठाण्यात वाद उफाळण्याची चिन्ह!
वडील प्रकाश परांजपे हे खासदार म्हणून १९९६ साली पहिल्यांदा निवडून आलेे. त्यावेळी आनंद दिघे यांनी प्रकाश परांजपे यांना घेऊन मातोश्री गाठली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्षही नसताना त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला होता. म्हणजेच आनंद दिघे आणि प्रकाश परांजपे यांनीही उद्धव ठाकरे यांनीही नेतृत्व मान्यच केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे हेच आहेत, हे त्या पिढीतील या दोन्ही जणांनी मान्य केले होते, असा दावा करत आनंद परांजपे यांनी या भेटीचे छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखविले. आजचे बाळासाहेबांच्या शिवसेनेतील लोक काय बोलतात, याला आपण फारसे महत्व देत नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील लोक आता खोटे बोलत आहेत. हे या छायाचित्रावरुन दिसत असून त्यावेळी आजचे शकुनीमामा आणि आजचे मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.