ठाणे : महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त प्रशांत रोडे यांना राज्य सरकारने बढती देऊन त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्त पदे आहेत. त्यापैकी एक जागा पालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी राखीव असून त्या जागी संदिप माळवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर, दुसरी जागा राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असून या जागेवर संजय हेरवाडे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली होती. राज्य सरकारने नवी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय या विभागात उपायुक्त पदावर हेरवाडे यांची बदली केली आहे.
यासंबंधीचे आदेश येताच महापालिकेचा पदभार सोडून हेरवाडे हे नव्या ठिकाणी रुजू झाले. त्यांच्या बदलीमुळे पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची जागा रिक्त होती. या जागेवर ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त प्रशांत रोडे यांना राज्य सरकारने बढती देऊन त्यांची नियुक्ती केली आहे.