ठाणे : परिवहन मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. रविवारी दुपारी त्यांनी ठाण्यातील खोपट आगाराला भेट देऊन तेथील असुविधांबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत त्यांना धारेवर धरले. तसेच महिन्याभरात येथे प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यापुढे चुकीला क्षमा नाही असेही ते म्हणाले. तत्त्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात आगारातील असुविधांविषयी अधिकाऱ्यांना बजावले होते. त्यानंतरही सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने एसटीच्या कारभाराविषयी सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

खोपट एसटी आगारात फेब्रुवारी महिन्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तत्त्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगाराची पाहाणी केली होती. त्यावेळी आगारात मोठ्याप्रमाणात असुविधा आढळून आल्या होत्या. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना खडसावत येथील असुविधांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. आगारात सुविधा उपलब्ध झाल्या की नाही याची पाहणी करण्यासाठी सरनाईक अचानक एसटी आगारात शिरले. त्यांनी पाहाणी केली असता, असुविधा कायम असल्याचे दिसून आले. स्वच्छतागृह, स्नानगृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रवाशांनाही वेळेत बसगाड्या उपलब्ध होत नाही.

हेही वाचा…शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू

पहिला दिवस असल्याने कारवाईचा हेतू नाही. पण शिस्त असावी. ठाणे आमचे घर आहे. त्यामुळे घरापासून सुरूवात करावी यासाठी या आगाराची पाहाणी केली. भविष्यात राज्यातील इतर आगारांचीही पाहणी करणार आहे असे सरनाईक म्हणाले. या समस्यांचे निराकारण होऊ शकते. भविष्यात चुकीला क्षमा नाही. एका महिन्यात रिझल्ट दाखवा अशा सूचना सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Story img Loader