ठाणे : राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाचे सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी केल्याची चर्चा असून त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात भाष्य केले आहे. परिवहन विभागाचा मंत्री असल्यामुळे माझा निर्णय अंतिम असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयात शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध प्रकल्प कामांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाचे सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या निर्णयावर भाष्य केले. राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराचा जो अध्यक्ष असतो, तो राजकीय व्यक्तीच असतो. मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची महामंडळाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली होती. परंतु गोगावले हे मंत्री झाल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष पद रिक्त झाले.
त्यामुळे या पदावर काम करण्याची संधी कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला मिळणार आहे. हि संधी उपलब्ध होईपर्यंत ती जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात परिवहन विभागाचे सचिव संजीव सेठी यांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे राजकीयदृष्ट्या कोणीही भांडवल करू नये, असे सरनाईक म्हणाले. मी त्या पदाचा प्रमुखच आहे. सगळी जबाबदारी माझीच आहे. ते केवळ एका महामंडळाच अध्यक्ष पद असते. त्यांनी कुठलेही काहीही निर्णय घेतले तरी ते शेवटी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मीच अंतिम निर्णय घेत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
लाडक्या बहिण योजनेसाठी सुरूवातीपासून निकष लावले होते. त्याच निकषाच्या आधारे जर कोणी गैरफायदा घेऊन जर पैसे घेतले असतील ते शासनाला परत द्यावे. किंबहुना ज्या लाडक्या बहिणींनी दोन दोन ठिकाणाहून अर्ज भरले होते, त्याच्या खात्या मध्ये १५०० रुपये जमा झाले होते. त्या बहिणींनी सुद्धा पैसे परत करण्याची तयारी स्थानिक संस्थांकडे अर्जाद्वारे दर्शविली आहे, असेही सरनाईक म्हणाले.