अंबरनाथ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे माध्यम सल्लागार प्रतीक शर्मा यांची शिवसेनेच्या सोशल मीडिया उपराज्य प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या फुटी नंतर समाज माध्यमांमुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा उजळण्यासाठी समाज माध्यमांवर जे प्रयत्न झाले त्यामध्ये प्रतीक शर्मा यांचा मोलाचा वाटा होता. मूळचे अंबरनाथकर असलेले शर्मा श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या निमित्ताने श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडे शिवसेनेची सोशल मीडियाची धुरा गेल्याचे बोलले जाते.
सोशल मीडियाची भूमिका जनमत निर्मितीमध्ये महत्त्वाची मानली जाते. गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर प्रसारित झालेले वाक्य, चित्र अधिक परिणामकारक ठरले आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये मोठा फरक दिसून आला. परिणामी सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करणारे पक्ष सोशल मीडियासाठी स्वतंत्र नेमणुका करू लागले आहेत. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया तज्ञ, व्यक्ती या कामी नेमल्या जातात.
शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर समाज माध्यमांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकमेकांना लक्ष्य केले गेले. त्यासाठी जलपकांची मोठी सज्जता ठेवली गेली. त्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी चांगली तयारी केली होती. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आता समाज माध्यमांवर विशेष लक्ष ठेवले जाते आहे. त्याच दृष्टीने शिवसेनेने एक नवीन व्यक्ती केली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना शिंदे गटात मोठी जबाबदारी असलेल्या श्रीकांत शिंदे यांचे माध्यम सल्लागार असलेल्या अंबरनाथकर प्रतिक शर्मा यांची शिवसेना सोशल मीडिया उप राज्यप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये जनसंपर्क मोहीम राबवत त्यांनी प्रभाव पाडला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिवसेना पक्षाच्या सोशल मीडिया धोरणांमध्ये शर्मा यांची महत्त्वाची भूमिका होती.
श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तिय आणि अंबरनाथकर असल्याने प्रतीक शर्मा यांच्या निवडीला महत्त्वाचे मानले जाते. एकूणच शिवसेना पक्षात श्रीकांत शिंदे यांच्या शब्दाला मोठे वजन आहे. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा शब्द चालतो. आता श्रीकांत शिंदे यांच्या सोशल मीडियाची जबाबदारी यशस्वीपणे पाडणाऱ्या प्रतीक्षा यांच्याकडे सोशल मीडियाचे महत्त्वाची जबाबदारी दिल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.