कल्याण : कल्याणमधील रहिवासी असलेले प्रवीण पवार यांची हवाई क्षेत्रात कॅप्टन पदी नियुक्ती झाली आहे. कठोर मेहनत, खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आपणास हे यश मिळाले आहे, असे कॅप्टन प्रवीण पवार यांनी सांगितले. यापूर्वी कल्याणमधील एक उच्चशिक्षित महिला हवाई क्षेत्रात कॅप्टन पदावर मागील काही वर्षापासून कार्यरत आहेत.अक्सा एअरमध्ये प्रवीण पवार कॅप्टन म्हणून काम करणार आहेत. प्रवीण पवार आपल्या कुटुंबीयांसह कल्याणमध्ये राहतात. अंबरनाथ येथील उसाटणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका संगीता पवार, मुंबई पालिकेतून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले शिक्षक नंदलाल पवार यांचे प्रवीण चिरंजीव आहेत. प्रवीण यांनी आपले शालेय शिक्षण कल्याण पूर्वेतील गणेश विद्यामंदिरात पूर्ण केले.

शालेय जीवनापासून प्रवीण यांना क्रीडा, थरार खेळ यांचे विशेष आकर्षण होते. त्याच्या वडिलांनी प्रवीण शाळेत असताना प्रवीणाला पायलट करण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे त्यांना बारामती येथील पायलट प्रशिक्षण केंद्र आई, वडिलांनी दाखविले होते. तेव्हापासून प्रवीण यांची पायलट होण्याची इच्छ प्रबळ होती. तलवारबाजी खेळात प्रवीण निपुण आहेत. शालेय जीवनापासून प्रवीणा यांना ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अंकुश आहेर, दिवंगत शिक्षक गुणेश डोईफोडे, ठाणे जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष विलास वाघ, राज्य संघटनेचे अशोक दुधारे यांचे मार्गर्शन लाभले. राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रवीण यांनी यश मिळवले.

बारावीनंतर प्रवीण यांनी पायलट होण्यासाठीची पूर्व परीक्षा दिली. त्यांनी पुढील प्रशिक्षण कॅनडा येथे पूर्ण केले. तेथील कठोर मेहनतीचे, खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले. त्यानंतर येथील विमानोड्डाणाच्या आवश्यक परीक्षा देऊन, प्रशिक्षण पूर्ण करून सुरुवातीला प्रवीण यांनी जेट एअरवेजमध्ये पायलट म्हणून नोकरी केली. त्यानंतर अक्सा एअरमध्ये ते काम करू लागले. या कालावधीत प्रवीण यांनी कॅप्टन पदाची परीक्षा दिली. त्यात ते यशस्वी झाले. प्रवीणमधील धडाडी, चिकाटी, कठोर मेहनत घेण्याची तयारी पाहून अक्सा एअरने प्रवीण यांची कॅप्टन पदी नियुक्ती केली. कठोर मेहनत, चिकाटीमुळे आपण या पदापर्यंत पोहचलो, असे प्रवीण सांगतात.

पायलट, कॅप्टन होण्यासाठी जवळ पैसा असुन चालत नाही तर त्यासाठी स्वताहून कष्ट, मेहनत, जिद्द, अभ्यास, खडतर प्रशिक्षण घेण्याची गरज असते. या सगळ्या खडतर परीक्षा प्रवीण उत्तीर्ण झाला म्हणून त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे, असे प्रवीणचे वडील नंदलाल पवार यांनी सांगितले. मराठी शाळेतून शिक्षण घेणारा एक मराठी मुलगा कॅप्टन पदावर नियुक्त झाल्याने कल्याण परिसरातील नागरिकांकडून प्रवीण यांचे कौतुक केले जात आहे.

Story img Loader