लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच, ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात गर्भवती महिलेवरील उपचारात डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हलगर्जीमुळे महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयाने अहवाल तयार केला होता. या अहवालामध्ये डॉक्टरने हलगर्जी केल्याचे उघड झाल्यानंतर बुधवारी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.
घोडबंदर भागात राहणाऱ्या महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा २०२२ मध्ये मृत्यू झाला होता. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत्यूपूर्वी तिला मध्यरात्री नातेवाईकांनी घोडबंदर येथील मानपाडा भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दुपारी उशीरापर्यंत तिच्यावर त्या उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेल्यानंतर बाळाचा आणि तिचा मृत्यू झाला होता.
संबंधित खासगी रुग्णालयात योग्य उपचार झाले नसल्याचा जबाब महिलेच्या पतीने कासारवडवली पोलिसांना दिला होता. त्यामुळे या प्रकरणाबाबत अहवाल ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालाकडून तयार केला जात होता. दरम्यान, गेल्यावर्षी महिलेच्या पतीचा देखील मृत्यू झाला. आता महिलेच्या मृत्यू बाबत अहवाल सादर करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री कासारवडवली पोलिसांनी महिलेच्या वडिलांना कासारवडवली पोलीस ठाण्यात बोलावले. तसेच त्यांना अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालामध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरकडून उपचाराबाबत हलगर्जी झाल्याचे समोर आले आहे. हे रुग्णालय ठाणे चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनीषा भिसे या गर्भवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तनीषा यांच्या उपचारासाठी तिच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. तनीषा यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते. त्यानंतर ठाण्यात देखील खासगी रुग्णालयात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.