ठाणे : भिवंडी येथे एका बोगस डाॅक्टराच्या उपचारामुळे ३१ वर्षीय गरोदर महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोगस डाॅक्टर अब्दुल रकीब मोहम्मद जलीम अहमद शेख (३०) आणि रुग्णालयाची नोंदणी न करता रुग्णालय चालविणाऱ्या डाॅक्टर केतन खडके (४१) यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी एका बोगस डाॅक्टर दाम्पत्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता गरोदर महिलेचा नाहक मृत्यू झाल्याने भिवंडी शहरातील बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. सरकारने अशा बोगस डाॅक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. भिवंडी येथील वडपे भागात राहणाऱ्या मिनाक्षी भालेकर या गरोदर होत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना टेमघर येथील स्वस्तीक क्रिटीकेअर हाॅस्पिटल अँड आयसीयु या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाला ‘राजकीय’ टपऱ्यांचा विळखा, पालिका अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याची बदलीची धमकी

उपचारा दरम्यान २५ जानेवारीला मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अकस्मातमृत्यूची नोंद करण्यात आली होती. २७ जानेवारीला पोलिसांनी याची माहिती भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वैद्यकीय पथकाने याची पडताळणी केली. त्यावेळी मिनाक्षी यांच्यावर उपचार करणारे डाॅक्टर अब्दुल शेख याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. तसेच रुग्णालयाचे प्रमुख डाॅक्टर यांच्याकडेही रुग्णालयाच्या नोंदणी आणि परवानगीची माहिती उपलब्ध नव्हती.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील लोकल वेळ दर्शक सव्वा तास बंद

त्यानंतर भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजकुमार शर्मा यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोघांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेकडून रुग्णालय बंद करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील प्रमुख डाॅक्टराचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. दुपारी उशीरापर्यंत अब्दुल शेख आणि केतन यांच्याविरोधात अटकेची कारवाई झाली नव्हती. गेल्या तीन ते चार महिन्यांत भिवंडी शहरात पाच बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एका व्यक्तीचा बोगस डाॅक्टर दाम्पत्याच्या उपचारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी तीन बोगस डाॅक्टरांविरोधात दवाखाना थाटून व्यवसाय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

Story img Loader