कल्याण शिळफाटा रस्त्यावर अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतीत असलेले प्रीमिअर कॉलनी येथील टपाल कार्यालय सागाव येथील नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. काही वर्षांपासून जुन्या इमारतीत कुबट वातावरणात बसून हैराण झालेल्या या टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
‘लोकसत्ता ठाणे’ने गेल्या कल्याण डोंबिवलीतील टपाल कार्यालयांच्या दुरावस्थेवर १५ भागांची मालिका प्रसिध्द केली होती. त्याची दखल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री गुरूदास कामत, माजी खासदार आनंद परांजपे यांनी घेतली होती. या टपाल कार्यालयांचे नुतनीकरण करण्याचे आश्वासन तत्कालीन मंत्र्यांनी माजी खासदार परांजपे यांना दिले होते. त्यानंतर हा विषय पुन्हा लालफितीत अडकला होता. मानपाडा येथील पॉल प्युजो (प्रीमिअर) कंपनी सुरू होती. त्यावेळी या कंपनीतील सुमारे १८०० कामगार, कंपनीचे टपाल व परिसरातील रहिवाशांचा विचार करून टपाल विभागाने शिळफाटा रस्त्यावरील प्रीमिअर कामगारांच्या वसाहतीत तळमजल्याला टपाल कार्यालय सुरू केले होते. १९९८ मध्ये पाल प्युजो कंपनी बंद पडली. त्यानंतर प्रीमिअर कॉलनीतील टपाल कार्यालय सुरूच राहिले. प्रीमिअर वसाहतीकडे कंपनीचे दुर्लक्ष झाले. या इमारतींची देखभाल दुरूस्ती नियमित होत नसल्याने या वसाहतीमधील इमारती धोकादायक झाल्या आहेत. या इमारतीमधील तळमजल्याला असलेले टपाल कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करावे याविषयी टपाल कार्यालयाचे अधिकारी विचार करीत नव्हते. दोन खोल्यांमधील कुबट, अंधाऱ्या वातावरणात येथील कर्मचारी काम करीत होते. पाणी, स्वच्छतागृह, वीज अशी दुरवस्था होती. वीज गेली की मेणबत्त्या घेऊन कर्मचाऱ्यांना काम करावे लागत होते.
प्रीमिअर कॉलनीतील टपाल कार्यालय सागाव येथे स्थलांतरित
कल्याण शिळफाटा रस्त्यावर अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतीत असलेले प्रीमिअर कॉलनी येथील टपाल कार्यालय सागाव येथील नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
First published on: 06-08-2015 at 12:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premier colony post office shifted