ठाणे : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे अवघ्या काही तासांत पक्ष प्रवेश करणार असल्याने टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठावरील फलकावर पक्षप्रवेश सोहळा असा उल्लेख करण्यात आला आहे. आनंद आश्रमात देखील साळवी यांच्या पक्ष प्रवेशाची तयारी सुरू झाली आहे.
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक होते. परंतु काही दिवसांपासून ते नाराज होते. मागील अनेक दिवसांपासून ते भाजप किंवा शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती. अखेर बुधवारी त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंद आश्रमात त्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे.
पक्ष प्रवेशासाठी टेंभीनाका बाहेरील पदपथावर व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठावरील मागील बाजूस बसविलेल्या फलकावर मोठ्या आकारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र आहे. फलकाच्या डाव्या बाजूस शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आहे. तर उजव्या बाजूस शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. या फलकावर ‘शिवसेना पक्षप्रवेश सोहळा’ असा उल्लेख आहे. याच व्यासपीठावर माजी आमदार राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यांच्यासह राजापूरमधील ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिली. आनंद आश्रमामध्येही पक्षप्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिंदे गटाचे ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आनंद आश्रमात जमण्यास सुरूवात झाली आहे. पक्ष प्रवेशापूर्वी राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बुधवारी रात्री देखील शिंदे यांच्या निवासस्थानी साळवी गेले होते. तिथे एक बैठक झाल्याचे देखील कळते आहे.
राजन साळवी यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मोजके आमदार होते. त्यापैकी राजन साळवी हे होते. परंतु त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू आहे. त्यातच २०२४ मध्ये विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत.