- तांत्रिक माहिती गोळा करण्यास सुरुवात
- राज्य सरकार विरोधनाटय़ संपवणार
अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिका होऊ नये यासाठी या दोन्ही शहरातील सर्वच राजकीय पक्ष एकवटले असले, तरी प्रशासनाने मात्र यासंबंधीच्या तांत्रिक बाजूंची तपासणी सुरू केली आहे. या महानगरपालिकेच्या निर्मितीसाठी योग्य तो अहवाल तयार केला जात असून मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण आयुक्तांच्या बैठकीत सर्वच बडे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी अंबरनाथ व बदलापूर या शहरांची भौगोलिक हद्द, शहरांची उत्पन्नाची साधने, जवळची गावे आदींबाबतीची तांत्रिक माहिती पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ही माहिती हाती येताच पुढील बैठकीची रूपरेषा ठरणार असल्याचे सूत्रांकडून कळते आहे.
अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिकेच्या निर्मितीवरून सध्या या शहरांमधील राजकारण चांगलेच तापले आहे. हा विरोध करण्यात बदलापूर शहरातील राजकीय नेते आघाडीवर असून येथील लोकप्रतिनिधींनी या मुद्दय़ावरून आतापासूनच रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी या शहरांची महानगरपालिका निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या कामास मात्र मंगळवारपासून सुरुवात झाली. या शहरांची महापालिका निर्माण करावी हा उद्देश समोर ठेवूनच ही समिती काम करू लागल्याची चर्चा सध्या शासकीय वर्तुळात होत आहे. मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्याधिकारी आबासाहेब जऱ्हाड, ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्यासह समितीतील अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिकांच्या सध्याच्या भौगोलिकहद्द, उत्पन्नाची साधने, आजूबाजूची जवळची गावे व त्यांचे उत्पन्न आदींबाबतची तांत्रिक माहिती प्रथम जमा करण्याच्या हेतूने चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजत असून ही माहिती पुढील सभेत सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला नसला तरी पुढील बैठक ही येत्या दहा दिवसांत म्हणजे १६ जानेवारीला होणार असल्याचे समजते आहे.
या शहरांची महापालिका निर्माण करण्याच्या हेतूने ही समिती आपला अजेंडा राबवणार असल्याची चर्चा शासकीय वर्तुळात दबक्या आवाजात चालू आहे. त्यामुळे अंबरनाथ व बदलापूरमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी चालू असलेल्या राजकीय विरोधनाटय़ाच्या अंकावर राज्य सरकारच पडदा टाकणार असल्याचे दिसून येत आहे.
विशेष सभा कधी?
बदलापूर पालिकेतील सर्व पक्षीय राजकीय सदस्यांनी अंबरनाथसह महापालिकेला विरोध केला आहे. यासाठी या सदस्यांनी गेल्या महिन्यातील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोकण आयुक्तांच्या बैठकीआधी बदलापूर पालिकेत महापालिकेच्या मुद्दय़ावर विशेष सभेची मागणी केली होती. यासाठी भाजपच्या व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या सह्य़ा त्या संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी घेत पालिकेकडे मागणी केली होती. मात्र, अशी विशेष सभाच झाली नसल्याने या विशेष सभेच्या वल्गना हवेतच विरल्या की काय? अशी शंका अनेक राजकीय जाणकार सध्या उपस्थित करत आहेत.