ठाण्यात शिंदे गटाविरोधात दोन दिवसांपूर्वी ५० खोके, माजलेत बोके असा मजकूर लिहीलेले फलक उभारण्यात आले होते. याप्रकरणी मंगळवारी सांयकाळी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाजवळ ‘खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके- माजलेत बोके’ आणि ‘भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’ असे मजकूर लिहिलेले फलक उभारण्यात आले होते. हे फलक कोणी उभारले याची माहिती फलकावर नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. या घटनेनंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टिकाही केली होती. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी जाणीवपूर्वक तणाव व तेढ निर्माण करणारा प्रकार केल्याचे सांगत महापालिकेने हे फलक काढून टाकले. तसेच महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फलक बनविणाऱ्या गणेश तेकाडे, उमेश कांबळे, सचिन गंभीरे या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच फलक उभारल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विक्रम खामकर यांच्यासह एका पदाधिकाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.