ठाणे : दर्जेदार अभिनय, वास्तववादी लिखाणाची आणि उत्कृष्ट नेपथ्याची सांगड असलेल्या एकांकिकांची बहुप्रतीक्षित स्पर्धा अर्थातच ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या ठाणे विभागाची प्राथमिक फेरी आज, शनिवार, २ डिसेंबर रोजी सुरुवात होणार आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या स्पर्धेसाठी तयारी केलेल्या महाविद्यालयांची या प्राथमिक स्पर्धेत चुरस दिसणार आहे.आज शनिवार, २ डिसेंबर आणि उद्या रविवार, ३ डिसेंबर रोजी रंगणाऱ्या या स्पर्धेत आपल्या उत्तम सादरीकरणाच्या जोरावर परीक्षांची मने जिंकणाऱ्या महाविद्यालयाला विभागीय अंतिम फेरीत नाव निश्चित करता येणार आहे.
गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात लोकांकिका स्पर्धा पार पडली. एकाहून एक दर्जेदार एकांकिका, त्याला लाभलेले उत्कृष्ट नेपथ्य, मान्यवर परीक्षकांचे परीक्षण आणि चित्रपटसृष्टीतील नामांकित कलावंतांची उपस्थिती अशा कलामय वातावरणात गेल्या वर्षीची लोकांकिका मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाही त्याच जल्लोषात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन नाट्यविश्वात मानाची समजल्या जाणाऱ्या आणि नाट्यप्रेमी ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिकेची आतुरतेने वाट पाहात असतात. या स्पर्धेला यंदाही ठाणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालये आपल्या उत्तम कलाकृती सादर करण्यासाठी सहभागी झाली आहेत. लोकांकिकेच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक विद्यार्थी एकत्र येत खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना आपल्या अभिनयातून आणि सादरीकरणातून लढत देतात. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले कलागुण दर्शविण्याची उत्तम संधी मिळणार आहे. राज्यातील आठ केंद्रांवर निवड झालेले महाविद्यालय आणि त्यांच्या दर्जेदार एकांकिकांचे सादरीकण या स्पर्धेच्या निमिताने अनुभवायला मिळते.
या एकांकिका स्पर्धेकडे मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचेही या स्पर्धेकडे विशेष लक्ष असते. गेल्या काही वर्षांत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने नाट्यवर्तुळात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक कलाकारांना सिने, नाट्य क्षेत्रात काम करण्याची संधीदेखील मिळाली आहे. याच बहुप्रतीक्षित स्पर्धेची ठाणे विभागाची प्राथमिक प्राथमिक फेरी आज शनिवारी २ डिसेंबर रोजी रंगणार आहे. या फेरीत उत्तम सादरीकरण करणाऱ्या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.
मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला रविवारपासून सुरुवात
रंगभूमी आणि एकंदरीतच मनोरंजन क्षेत्राचे मध्यवर्ती केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई नगरीत दरवर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धांच्या निमित्ताने एक जल्लोष पाहायला मिळतो. गेल्या सात वर्षांत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने मुंबईतील नाट्यवर्तुळात घट्ट ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या मुंबई विभागातील प्राथमिक, विभागीय अंतिम फेरीबद्दलही कलाकारांमध्ये उत्सुकता असते. यंदा मुंबईच्या विभागीय प्राथमिक फेरीला रविवारी, ३ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. ३ आणि ४ डिसेंबर असे दोन दिवस मुंबई विभागाची प्राथमिक फेरी रंगणार आहे.
मुख्य प्रायोजक
●सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक
●झी टॉकीज
●भारती विद्यापीठ, पुणे</p>
●शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट
पॉवर्ड बाय ●केसरी टूर्स
●शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर ●श्री नेमिनाथ ज्वेलर्स
●एन एल दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च
साहाय्य ●अस्तित्व
टॅलेंट पार्टनर ●आयरिस प्रॉडक्शन