कल्याण– शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे गुणवंत शिक्षक, आदर्श शाळा चालकांचा आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कर्णिक रस्ता येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेसह अन्य एका शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त उपायुक्त मंगेश चितळे, शिक्षण विभाग उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी, उपायुक्त धर्येशील जाधव, अवधूत तावडे, अर्चना दिवे, जनसंपर्क प्रमुख संजय जाधव, प्रशासनाधिकारी रंजना राव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे उपस्थित होते.
हेही वाचा >>> डोंबिवलीत दस्त नोंदणीसाठी दाखल बनावट कागदपत्रे पकडली, दलाल-भूमाफियांमध्ये खळबळ
पालिका हद्दीतील महापालिका, खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील गुणवंत सहा शिक्षकांना आदर्श शिक्षक, कर्णिक रस्ता येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेसह अन्य एका शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, चौथी व सातवीच्या प्रत्येकी एक विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्राथमिक विद्यामंदिराचा पुरस्कार मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांनी स्वीकारला. यावेळी संस्था पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. आपल्याला शिक्षक दररोज जे शिकवतात त्यामधून आपण प्रगतीचे पुढचे टप्पे गाठत असतो. त्यामुळे शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन दरवर्षी साजरा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपायुक्त कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आपला विद्यार्थी सर्वोच्च पदाला पोहचणे हाच खरा शिक्षकाला मिळालेला पुरस्कार आहे, असे संजय जाधव यांनी सांगितले. सूत्रसंचालन माजी शिक्षणाधिकारी रवींद्र जगदाळे यांनी केले.