नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : राज्यातील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे ठाणे , नवी मुंबई परिसरात अवजड वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे ठाणे, घोडबंदर तसेच परिसरातील रस्त्यांवर अवजड वाहतुकीचा भार कमी होऊन कोंडीमुक्त झाल्याचे चित्र दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यातील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत आहेत. अवजड वाहनांमुळे नवी मुंबईत कोंडी होऊ नये म्हणून शुक्रवारी ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. गुजरात राज्य आणि भिवंडी येथून हजारो अवजड वाहने उरण जेएनपीटी येथे वाहतुक करत असतात. ही अवजड वाहने ठाण्यातील मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा मार्गे नवी मुंबईत जातात. तसेच नाशिक येथून सुटणाऱ्या अवजड वाहनांचा भारही या मार्गावर मोठा असतो. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत वाहतुक करण्यास मुभा आहे. या कालावधीत ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रस्त्यांवर अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होते. परंतु शुक्रवारी मात्र शहरात उलट चित्र दिसून आले.

आणखी वाचा-ठाणे : अटल सेतू, दिघा स्थानकाच्या कार्यक्रम पत्रिकेतून खासदार राजन विचारे यांचे नाव वगळले

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी नवी मुंबईत येणार आहेत. या कालावधीत मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुपारी अवजड वाहनांचा भार वाढल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अवजड वाहनांना पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांना वाहतुक करण्यास प्रवेश बंदी केली आहे. यामुळे ठाणे, घोडबंदर तसेच परिसरातील रस्त्यांवर अवजड वाहतुकीचा भार कमी होऊन कोंडीमुक्त झाल्याचे चित्र दिसून आले.

Story img Loader