पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशाने डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीचा पुरेपूर अनुभव असलेल्या एका डोंबिवलीकर महिलेने गेल्या महिन्यात परिसरातील अस्वच्छतेबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशीच या तक्रारीवर कार्यवाही करण्याच्या सूचना कल्याण-डोंबिवली महापालिकेला करण्यात आल्या आणि कित्येक दिवस रखडलेले हे स्वच्छतेचे काम अवघ्या आठ दिवसांत सुरू झाले. अशा रीतीने ऑनलाइन सुविधेमुळे गल्लीतल्या समस्येची दिल्लीतून दखल घेतली गेल्याने तक्रारदार महिलेसह विभागातील नागरिकांनाही सुखद धक्का बसला आहे.
डोंबिवलीतील औद्योगिक वसाहतीलगत असणाऱ्या सुदर्शन नगरमधील रहिवासी गेली पाच वर्षे या परिसरातील अस्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करीत आहेत. मात्र पूर्वीची ग्रामपंचायत असो वा आताची महापालिका, त्यांची समस्यांची कधी फारशी गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सुदर्शन नगरमधील पाम व्ह्य़ू सोसायटीत राहणाऱ्या सुषमा रहाटे यांनी गेल्या ३० जून रोजी परिसरात साचून राहणाऱ्या कचऱ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. या इमारतीच्या मागून पावसाळी पाणी वाहून जाणारा नाला आहे. कचरा या नाल्यात पडतो. त्यामुळे पाणी तुंबते आणि कचरा कुजल्याने परिसरात दरुगधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येते. स्थानिक प्रशासनाने दैनंदिन कचरा गोळा करावा इतकीच परिसरातील नागरिकांची माफक अपेक्षा होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून मात्र कोणताही प्रतिसाद नव्हता. सुषमा रहाटे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयात दाद मागितली. मनातील सल व्यक्त करण्यासाठी सुषमाताईंनी हा पत्रप्रपंच केला खरा; पण त्याची इतक्या तातडीने दखल घेतली जाईल, याची त्यांनाही कल्पना नव्हती. सुषमाताईंची तक्रार पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर तातडीने सूत्रे हलली. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित सुषमा रहाटे यांची भेट घेऊन त्यांची समस्या समजून घेतली आणि दुसऱ्याच दिवसापासून परिसरातील कचरा उचलला जाऊ लागला. नाल्याचीही स्वच्छता करण्यात आली.
पंतप्रधान कार्यालयाकडून महापालिकेच्या ई-मेलवर डोंबिवलीतील तक्रार आल्यावर कर्मचाऱ्यांनी त्वरित संबंधित महिलेची भेट घेऊन समस्या समजून घेतली. इमारतीमागच्या नाल्यात बराच कचरा साचला होता. तो काढून टाकण्यात आला. तसेच आता दररोज येथील कचरा उचलला जात आहे.
– धनाजी तोरसकर, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिका
पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने येथील कचरा उचलण्यास सुरुवात केली, त्याबद्दल त्यांचे आभार. नाला उघडा असल्याने त्यात कचरा टाकला जातो. त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नाला बंदिस्त करावा लागणार आहे.
– सुषमा रहाटे, तक्रारदार