मागील वर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांनी वाढ
पूर्वा साडविलकर
ठाणे : करोनाकाळात लागू करण्यात आलेल्या र्निबधांमुळे मागील वर्षी लग्नपत्रिका छपाई व्यवसायाला घरघर लागली होती. गेल्या काही महिन्यांपासून निर्बंध शिथिल झाल्यामुळे विवाह सोहळे मोठय़ा प्रमाणात होऊ लागले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४० ते ५० टक्क्यांनी पत्रिका छपाईत वाढ झाल्याने मुद्रण व्यवसायालास दिलासा मिळाला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी टाळण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळ्यांवरही निर्बंध घालण्यात आले होते. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केवळ २० ते ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडण्याची राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे अनेकांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर, काहींनी साध्या पद्धतीने तसेच विवाह नोंदणी कार्यालयात विवाह पार पाडले होते. त्यासाठीची माहिती समाजमाध्यमांद्वारे देण्यात येत होती.
छापील उत्पादनांचा वापर करोनाकाळात एकदमच थंडावला होता. त्याचा थेट परिणाम मुद्रण व्यवसायावर झाला. लग्न पत्रिकांच्या छपाईची मागणी थेट ५० टक्क्यांवर आली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये टाळेबंदीत शिथिलता आल्याने काही अंशी व्यवसाय वाढला होता. मात्र दुसऱ्या टाळेबंदीची कुणकुण लागताच त्यात पुन्हा घट होऊ लागली होती.
गेल्या काही महिन्यांत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सरकारने निर्बंध शिथिल केले. विवाह सोहळेही सभागृहाच्या ५० टक्के आसन क्षमतेने पार पाडण्यास परवानगी दिली. ही परवानगी लग्न सराईच्या काळातच दिल्याने बाजारात लगबग पाहायला मिळत आहे. लग्न सोहळ्यांशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिकांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यातच लग्नपत्रिका छपाईचा व्यवसाय पुन्हा उभारी घेत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४० ते ५० टक्क्यांनी पत्रिका छपाईत वाढ झाली आहे.
छपाईत दुपटीने वाढ
मागील वर्षी र्निबधांमुळे वर आणि वधूच्या कुटुंबाकडून केवळ ३० ते ४० पत्रिका छापण्यात येत होत्या. मात्र, यंदा १०० ते १५० पत्रिका छापण्यात येत असल्याची माहिती पत्रिका छपाई व्यवसायिकांकडून देण्यात आली.
व्यावसायिकांमध्ये नाराजी कायम
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लग्न सोहळय़ांचे प्रमाण वाढले आहे. पत्रिका छपाईत वाढ झाली आहे. मात्र, अद्याप लग्न सोहळे हे ५० टक्के क्षमतेने होत असल्यामुळे ग्राहक जेमतेम १०० ते १५० पत्रिकाच छापतात. करोनापूर्वीच्या काळात ग्राहक सरासरी ३०० ते ५०० पत्रिका छापल्या जात असत. आता हे प्रमाण घटल्यामुळे अजूनही हवे तसे उत्पन्न मिळत नसल्याची माहिती ठाण्यातील पत्रिका छपाई व्यावसायिक शैलेश गांधी यांनी दिली.