दोन हजार कैद्यांचा अतिरिक्त भरणा; पोलीस कर्मचाऱ्यांची मात्र कमतरता
जेमतेम ११०० कैदी ठेवण्याची क्षमता असलेल्या ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सद्य:स्थितीत तीन हजारांहून अधिक कैद्यांना कोंबण्यात आले असून यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नियमानुसार प्रत्येक सात कैद्यांमागे कारागृहात एक पोलीस कर्मचारी असावा, असे बंधन आहे. मात्र, जिल्हा कारागृहात जेमतेम १९० कर्मचारी तैनात असून संख्येत वाढ करण्याचा प्रस्तावही गृह खात्याकडे प्रलंबित आहे.
ठाणे शहरात ज्या प्रमुख ऐतिहासिक वास्तू गणल्या जातात, त्यामध्ये मध्यवर्ती कारागृहाचा समावेश होतो. स्वातंत्र्यलढय़ातही या कारागृहाला अनन्यसाधारण महत्त्व होते. गेल्या काही वर्षांपासून मात्र या कारागृहावरील भार वाढू लागला आहे. तुरुंगात कैद्यांना ठेवणे, त्यांची देखभाल करणे, सुरक्षा पाहाणे, कैद्यांचे मानसिक संतुलन राखणे यांसारखी कामे येथील व्यवस्थापनाला नित्यनेमाने करावी लागतात. मात्र वाढत्या संख्येमुळे हे शक्यच होते असे नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सर्वसाधारणपणे ३००० कैद्यांसाठी या कारागृहात पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र हा भाग जेमतेम १९० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. येथील प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ कैद्यांची सुरक्षा पाहावी लागत आहे. याबाबत ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ठाण्यातील तुरु ंगात अपुरा कर्मचारी वर्ग असला तरी आहे त्या परिस्थितीत समन्वय साधून काम करण्याकडे अधिकाऱ्यांचा कल आहे, असे सांगितले. ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली असेल त्यांची शिक्षा शिथिलही करण्यात येते. एकूणच कैद्यांमधील कौशल्य, त्यांच्याकडे असलेले ज्ञान याचा उपयोग सकारात्मकदृष्टय़ा केला जाणार आहे, असे जाधव यांनी सांगितले.
ठाण्याच्या तुरुंगात असलेल्या ३००० कैद्यांमध्ये २००हून अधिक महिला कैदी आहेत, तर मोठी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची संख्या १०० पेक्षा जास्त आहे. कैद्याला अनेकदा न्यायालयात सुनावणीसाठी न्यावे लागते. त्यासाठीही पोलीस बळ कमी आहे. त्यामुळे कारागृहावरील अधिभार कमी करण्यासाठी येथील ५०० कैदी तळोजा कारागृहात वर्ग करण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे रवाना केला आहे. त्यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.