ठाणे कारागृहात विविध भाज्या, फळ, धान्याचे यशस्वी उत्पादन; वर्षभरात १३ लाखांचे उत्पन्न
गैरमार्गाला गेल्यामुळे अथवा गैरकृत्यामुळे कारागृहातील बंदीवासाची शिक्षा भोगणाऱ्या ठाणे कारागृहातील कैद्यांनी आपल्या शेतीकौशल्याने कारागृहाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सरकारी अनुदानात वारंवार होणारी कपात लक्षात घेऊन ठाणे कारागृहातील व्यवस्थापनाने स्वावलंबनाचा मार्ग अनुसरत सेंद्रीय शेतीसाठी कैद्यांना प्रोत्साहन दिले. कैद्यांसाठीच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी कारागृह आवारातच शेतीचा प्रयोग सध्या सुरू आहे. शेतीसाठीचे आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान आणि साधनसामग्रीचा वापर यात करण्यात आला. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत तब्बल १३ लाख रुपयांचे उत्पन्न काढण्यात आले.
राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये ८६० हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ३४२ हेक्टर शेतीसाठी वापरली जाते. ठाणे मध्यवर्ती कारागृहाला शेतीसाठी १० एकर जमीन उपलब्ध आहे.
या जमिनीत प्रामुख्याने धान्य, कडधान्य, फळ-पालेभाज्या आणि इतर भाजीपाला पिकवला जातो, तसेच येथे शेतीसह दुग्धउत्पादनही घेतले जाते, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे कृषीसेवक सूरज सूर्यवंशी यांनी दिली. सध्या कारागृहातील १० एकर जागेत भातशेती तसेच काही भागात नारळ लागवड, वेलवर्गीय भाजीपाला, वांगी, लाल-हिरवा माठ, पालक, अळू भाजी, मेथी, कोंथिबीर, कढीपत्ता, मिरची, मुळा, भेंडी यांसारख्या भाज्या घेतल्या जातात.
शेतीसाठी केवळ खुल्या कारागृहातील कैद्यांना परवानगी आहे. या कैद्यांना गांडूळ खत तयार करणे, निंबोळी खत तयार करणे आदींचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून सेंद्रिय शेती केली जाते. खुल्या कारागृहातील २५ कैदी येथे शेती करीत आहेत. यात कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे तीन विभाग आहेत. त्यांना ट्रॅक्टर चालविणे, जनावरांची राखण करणे, दूध काढणे, नांगरणी, पेरणी करणे यांसारख्या शेतीच्या कामांचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी अनुक्रमे ५५ रुपये, ५० रुपये आणि ४० रुपये रोजंदारी दिली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा