प्रमाणपत्र अभ्यासक्रम लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

शिक्षा भोगून कारागृहाबाहेर पडणाऱ्या कैद्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी ठाणे कारागृहात यापुढील काळात औद्योगिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. आतापर्यंत कारागृहात कैद्यांसाठी शिवणकाम आणि सुतारकामाचे प्रशिक्षण दिले जायचे. या माध्यमातून त्यांना अर्थार्जन करण्याची संधीही मिळत असे. मात्र, या जोडीला त्यांना औद्योगिक प्रशिक्षण घेता यावे यासाठी शासकीय तंत्रनिकेन संस्थेच्या साहाय्याने नवे वर्ग सुरू केले जाणार आहेत. यासंबंधीच्या प्रस्तावास सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती तुरुंगात कैद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेन, मुंबई या संस्थेतर्फे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासोबत कैद्यांकरिता विविध प्रशिक्षण शिबिरेही भरविण्यात येणार आहेत. कारागृह अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात कैद्यांना सहा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. त्यामध्ये रंगकाम, विजेचे काम (वायरमन), गवंडी काम, प्लम्बिंग(नळकाम), पार्लर, फॅशन डिझायनिंग आदीचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कैद्यांना प्रमाणपत्र दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या कैद्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर  त्यांना त्या-त्या क्षेत्राची सविस्तर माहिती देण्यात येईल. नंतर कैद्यांची रुची लक्षात घेऊन त्यांना प्रात्याक्षिके देण्यात येतील. येत्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारचे तंत्र प्रशिक्षण सुरू होणार अशी माहिती जाधव यांनी दिली.

कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्यांना शिवणकाम, सुतारकाम, खाद्यपदार्थ बनविणे आदी प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते; परंतु शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर हातातल्या कलाकुसरीला न्याय मिळेल याची शाश्वती देता येत नाही. यापुढे कैद्यांना औद्योगिक प्रशिक्षणासोबत कौशल्याला कोंदण लाभावे हा यामागचा उद्देश आहे.या प्रमाणपत्राचा कैद्यांना काम मिळण्यास उपयोग होईल, पर्यायाने त्यांचे समाजात पुनर्वसन होणार आहे.

Story img Loader