ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलावर शुक्रवारी सायंकाळी खासगी बसगाडीची विद्युत खांबाला धडक बसली. या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातामुळे पातलीपाडा ते मुलुंड टोलनाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईहून रात्री घरी परतणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. रात्री ९ वाजेनंतरही कोंडी कायम होती.
ठाणे महापालिकेच्या टीएमटी परिवहन सेवेच्या बसगाड्यांची सेवा प्रवाशांच्या तुलनेत अपुरी आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत मोठ्याप्रमाणात खासगी बसगाड्या घोडबंदर ते ठाणे रेल्वे स्थानक अशी अवैध प्रवासी वाहतूक करतात. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडीने उड्डाणपूलावरील दुभाजकाच्या एका विद्युत खांबाला धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, या अपघातामुळे बसगाडी बाजूला काढण्यासाठी घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहतूक काही कालावधीसाठी रोखून ठेवण्यात आली होती. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने बसगाडी रस्त्यावरुन बाजूला करण्यात आली. अपघातामुळे वाहनांचा भार वाढून पातलीपाडा उड्डाणपूल ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रात्री घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.