ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ असावे यासाठी पालिकेच्या आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा देण्याची तयारी खासगी डाॅक्टरांनी दाखविली आहे. त्यास ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या काळात शहरातील खासगी डाॅक्टर पालिकेच्या आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांमध्ये ठराविक वेळेत सेवा देण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरू केलेल्या ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचे तिसरे सत्र ठाणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. ठाणे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ असावे यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेवून विभागवार खाजगी व सरकारी रुग्णालयाचा समूह तयार करावा. या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करावी. यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन आहार कसा असावा, कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खावू नयेत याची माहिती सातत्याने द्यावी. ही माहिती नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी आकर्षक पध्दतीने फलक लावून त्यावर स्लोगन द्यावेत, निश्चितच हे माध्यम फायदेशीर ठरेल तसेच लहान मुलांना देखील याची माहिती मिळेल, अशा सुचना डॉ. प्रदीप उप्पल यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा… टिटवाळ्यात २२ हजार मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा, ३०० कोटींहून अधिकची थकबाकी

ठाणे महापालिका आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात सेवा देण्याची तयारी खासगी डाॅक्टरांनी यावेळी दाखविली. महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना दुपारी १२ ते ४ ही वेळ उपलब्ध करुन दिल्यास त्याचा निश्चितच लाभ गोरगरीब नागरिकांना होईल. तसेच उच्च वैद्यकीय शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी महाविद्यालय उभारावे, अशी सुचनाही डाॅक्टरांनी केली.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी औषधे स्वस्त दरात उपलब्ध देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी औषधालय उभारण्यात यावे. साथीचे आजार पसरू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी. काही नागरिक त्यांचे पाळीव प्राणी शहराच्या सार्वजनिक ठिकाणी फिरावयास नेतात, त्यांच्या माध्यमातून देखील शहरात घाण होत असते, यावर आळा बसणे आवश्यक आहे. असे प्रकार घडणार नाहीत यासाठी महापालिकेने नियमावली तयार करुन याची अंमलबजावणी करण्याची सूचना डॉ. महेश जोशी यांनी केली. शिवाय अनेक रस्त्यांवर काही वाहनचालक हे उलट्या दिशेने प्रवास करत असतात, अशा वेळी अपघात होवून दुर्घटना घडण्याची शक्यता असते याबाबत महापालिकेने वाहतूक विभागाशी सल्लामसलत करुन आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.

झोपडपट्टी कचरामुक्त असाव्यात आणि सार्वजनिक शौचालयात पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी सुचनाही त्यांनी केली. महापालिकेच्या माध्यमातून शहराला भूषण ठरेल असे दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह ठाण्यात उभारण्यात आले आहे. याठिकाणी आयपीएलचे सामने खेळविले जातील, यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावी अशी मागणी ठाणेकरांच्यावतीने डॉक्टरांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली. या चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉ. महेश जोशी, सचिव डॉ. सुनील बुधलानी, खजिनदार डॉ. मिनल गाडगीळ, ईएनटी सर्जन डॉ. प्रदीप उप्पल, मेडिसीन विभागाचे अध्यक्ष डॉ. अमित सराफ, आयएमएचे महाराष्ट्र सदस्य डॉ. संतोष कदम, डॉ. एम.पी.शाह, राजीव गांधी मेडिकल महाविद्यालयाचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. जयनारायण सेनापती, डॉ. मनीषा घोष आदी सहभागी झाले होते.

केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स मंडळीना एकत्रित घेवून बैठक आयोजित करणे आवश्यक असते. परंतु यासाठी कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध नाही. नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर अद्ययावत सेवासुविधांनी युक्त जागा उपलब्ध करून द्यावी. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत एनआयसीयूची सुविधा अत्यल्प आहे. ठाण्याची लोकसंख्या लक्षात घेता हे कक्ष अपुरे पडत आहे, तसेच ठाण्यात इतर भागातूनही लहान उपचारार्थ दाखल केले जाते. खाटा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकदा मुंबईत पाठविण्यात येते, यामध्ये वेळ व पैसा खर्च होत असून विपरीत घडण्याची शक्यता असते, तरी एनआयसीयूची संख्या वाढविण्याबाबत प्रामुख्याने विचार करावा. तसेच कोपरी येथील प्रसुतीगृह सकाळच्याच सत्रात सुरू असते, हे प्रसुतीगृह चोवीस तास सुरू राहील याबाबत नियोजन करावे. अनेक आजारांचा प्रसार हा डासांच्या माध्यमातून होत असल्याने शहरातील नाले, गटारे बंदिस्त गेल्यास डासांवर निर्बंध आणण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी देखील डॉक्टरांकडून करण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private doctors in thane will provide services in the hospitals along with the municipal health centers dvr
Show comments