लोकसत्ता प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद भागातील स्वामी समर्थ मठ भागात राहणाऱ्या एका खासगी सावकाराचे शीळ रस्त्यावरील काटई गावातील विजय सागर हॉटेलच्या तळ मजल्यावरुन तीन इसमांनी अपहरण केले आहे. देवाणघेवाणीच्या व्यवहारातून हा प्रकार घडला आहे, असे पोलिसांनी सांगितले. विलास रायकर असे खासगी सावकाराचे नाव आहे. अमोल पवार, राकेश बायकर अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. खासगी सावकार रायकर यांचा वाहन चालक अखिलेषकुमार रजक (३९) यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. रायकर नियमित आपल्या कामासाठी अंधेरी, विलेपार्ले, जव्हेरी बाजार येथे जातात.
पोलिसांनी सांगितले, खासगी सावकार विलास रायकर यांचा मुक्काम सोमवारी काटई गावातील विजय सागर हॉटेलमध्ये होता. मंगळवारी सकाळी ११ वाजता ते आपल्या मोटारीतून मुंबईत जाण्यास निघाले. त्यावेळी हॉटेलच्या तळमजल्याला लाल रंगाची एक मोटार उभी होती. त्या मोटारीतून दोन जण उतरले. त्यांनी रायकर यांना आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे सांगून मोटारीतून खाली उतरण्यास सांगितले. लाल मोटारातील दोन जणांनी आपण सोनारपाडा येथील क्लासिक हॉटेलमध्ये जाऊन बोलू असे सांगून त्यांना स्वताच्या मोटारीत बसविले. रायकर यांच्या चालकाला त्या हॉटेलजवळ येण्यास सांगितले.रायकर बसलेल्या वाहनाने अचानक वळण घेऊन वाहन शिळफाटा चौक दिशेने काढले. रायकर यांच्या चालकाने त्या वाहनामागून आपले वाहन नेले. ती मोटार पनवेलच्या दिशेने धाऊ लागली.
आणखी वाचा- ठाणे : लोकल प्रवाशांच्या हातावर फटका मारणारा चोरटा अटकेत
पनवेल भागात गेल्यावर चालक रजक याने रायकर यांना मी तुम्हाला कोठे घेण्यास थांबू असे विचारले. दुपारचे तीन वाजले तरी रायकर येत नाहीत. त्यांचा मोबाईल बंद येत होता. दरम्यान रायकर यांच्या चालकाला डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते समीर जगे यांनी संपर्क केला आणि रायकर यांचे आणि मोटारीतील लोकांचे १७ लाखाचा व्यवहार आहे. ते लोक रायकर यांना घेऊन गेले आहेत. तुम्ही परत या असे चालकाला सांगितले. जगे, योगेश काटे आणि चालक रजक रायकर यांना कोठे नेले असेल असा विचार करत होते. काटे यांचा मोबाईल हॉटेलच्या तळमजल्याला असताना अपहरणकर्त्यांनी घेतला होता. त्यांना मिसकॉल दिला होता.
मंगळवारी दुपारी जगे यांना रायकर यांनी संपर्क केला. आपणास शिक्रापूर भागात आणले आहे. तुम्ही मला सोडविण्यासाठी या असे सांगितले. मोटारीतील अमोल पवार याने जगे यांना सांगितले, रायकर यांनी दोन वर्षापूर्वी आपल्याकडून १७ लाख रुपये घेतले आहेत. ते पैसे परत करत नाहीत. तुम्ही पैसे घेऊन या. आम्ही तात्काळ रायकर यांना सोडवितो. जगे यांनी पवार यांना तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन समझोता करा. रायकर यांच्याकडून पैसे परत देण्यासाठी मुदत घ्या आणि त्यांना सोडून द्या, अशी सूचना केली. ती अपहरणकर्त्यांनी धुडकावली. या संभाषणानंतर रायकर आणि संबंधितांचे फोन बंद येत होते.
लाल मोटारीतील (एमएच-१२-एसएल-८३८८) तीन इसमांनी विलास रायकर यांचे पैशासाठी अपहरण केल्याची खात्री पटल्याने चालक रजक यांने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विशेष पथक तयार करुन अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आहे.