लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने वारंवार नोटिसा देऊनही डोंबिवलीतील चार मालमत्ता कर थकबाकीदार कर भरणा करत नव्हते. अखेर पालिकेच्या फ आणि ग प्रभागाच्या मालमत्ता कर विभागाच्या पथकाने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून संबंधितांच्या चार मालमत्ता सील करण्यात आल्या. या थकबाकीदारांनी २३ लाख १३ हजार रूपयांची पालिकेची कराची रक्कम थकवली आहे.
या कारवाईत काही खासगी शिकवणी वर्ग, इंग्रजी शिकवणारे वर्ग, काही निवासी संकुलातील सदनिकांचा समावेश आहे. डोंबिवलीतील फ प्रभागातील श्रीजी पॅलेसमधील सदनिकाधारक ५०१ या मालमत्ताधारकाने मालमत्ता कराची एक लाख ५५ हजार रूपयांची, तसेच, ओरिएंट सोसायटीमधील सी-४०९ सदनिकाधारकाने पालिकेची मालमत्ता कराची रक्कम भरणा केलेली नाही.
या दोन्ही थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकित कर रकमेचा भरणा करावा म्हणून फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, अधीक्षक महेश पाटील यांनी नोटिसा दिल्या होत्या. वारंवार नोटिसा देऊन, कर भरण्यासाठी या थकबाकीदारांना पुरेसा अवधी देऊनही त्यांनी मालमत्ता कराचा भरणा केला नाही. त्यामुळे साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, अधीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने अडीच लाखाहून अधिकची थकबाकी असणाऱ्या दोन्ही मालमत्ता सील केल्या.
डोंबिवली पूर्वेतील ग प्रभाग हद्दीत मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझामध्ये शीतल ॲकेडमी, सोहम क्लासेस या मालमत्ताधारकांकडे पालिकेची मालमत्ता कराची २० लाख ५८ हजार १९१ रुपये इतकी थकबाकी होती. मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या आदेशावरून ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी या दोन्ही थकबाकीदारांना कर भरण्याच्या नोटिसा पाठविल्या होत्या. वारंवार नोटिसा पाठवून, विहित वेळ देऊनही सोहम क्लास, शीतल ॲकेडमीच्या मालकांनी २० लाखाहून अधिक रकमेचा कर भरणा पालिका तिजोरीत केला नाही. त्यामुळे साहाय्यक आयुक्त कुमावत यांच्या आदेशावरून अधीक्षक कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी यांच्या कारवाई पथकाने कस्तुरी प्लाझा संकुलात येऊन थकबाकीदारांच्या दोन्ही मालमत्ता सील केल्या.
फ प्रभागाकडे मालमत्ता कर वसुलीसाठी १२४ कोटी ५५ लाखाचा लक्ष्यांक आहे. या प्रभागात न्यायालयीन प्रकरणे, जमीन, मालमत्ता वादात एकूण ७५ कोटी ४५ लाखाची रक्कम अडकून पडली आहे. ग प्रभागात मालमत्ता कराचा वसुली लक्ष्यांक १०६ कोटी २४ लाख आहे. या प्रभागात विविध प्रकारच्या गुंतवळ्यात पालिकेची ६८ कोटी २५ रक्कम अडकून पडली आहे.