लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : येथील योगीधाम भागातील आजमेरा हाईट्स संकुलातील मराठी कुटुंबियांना दहा जणांच्या साहाय्याने मारहाण करणारे शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातील अधिकारी अखिलेश शुक्ला यांचे खासगी वाहन येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या पथकाने शुक्रवारी जप्त केले. अंबर दिव्याचा वापर करण्याचे अधिकार नसताना शुक्ला यांनी या दिव्याचा वापर केल्याने त्यांना नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

अखिलेश शुक्ला यांच्या वाहनाचा विमा संपला आहे. त्यांच्या वाहनाचे पीयुसी संपले असताना मागील चार वर्ष ते त्यांचे खासगी वाहन महाराष्ट्र शासनाचा फलक लावून रस्त्यावर धावत होते. त्यांच्या वाहनात आतील बाजुला अंबर दिवा ठेवण्यात येत होता. अंबर दिव्याचा वापर कोणी करावा आणि करू नये यांचे केंद्रीय परिवहन विभागाचे नियम आहेत. त्या नियमांचे उल्लंघन पर्यटन विकास महामंडळातील शासकीय अधिकारी शुक्ला यांनी केले आहे. त्यामुळे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार, मोटार वाहन निरीक्षक प्रियंका टपळे यांच्या पथकाने शुक्ला यांचे खासगी वाहन आणि त्या वाहनाचा अंबर दिवा जप्त करण्याची कारवाई केली.

आणखी वाचा-फळबाजारात फडकतोय डाळींबाचा “भगवा”, आवक घटल्याने डाळींबाची चढ्या दराने विक्री

काय आहे प्रकरण

अजमेरा संकुलातील लता कळवीकट्टे यांनी घरात धूप अगरबत्ती लावली होती. या अगरबत्तीमुळे धूर झाला होता. या धुरावरून अखिलेश शुक्ला आणि लता यांच्यात वाद सुरू होता. शुक्ला हे लता यांना ‘तुम्ही मराठी लोक घाणेरडे असतात. मटण मासळी खाता. तुम्हा मराठी लोकांची इमारतीत राहण्याची पात्रता नाही’ असे बोलत होते. हे भांडण ऐकून शेजारी धीरज देशमुख घराबाहेर आले. शुक्ला यांना तुमचा वाद आपसात मिटवा, सर्व मराठी लोकांना तुम्ही अपमानित करू नका, असे सांगितले.

आपल्या बोलण्यावरून शुक्ला यांनी ‘मी मंत्रालयात कामाला आहे. मला मराठीचे सांगू नकोस. तुमच्यासारखे ५६ मराठी लोक माझ्या समोर झाडू मारतात. मी मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून एक फोन करीन तर तुमचे मराठीपण जाईल. थोडा वेळ थांब तुला बघून घेतो,’ अशी धमकी देशमुख यांना दिली. काही वेळाने देशमुख यांच्या घराची बेल वाजली म्हणून ते बाहेर आले. शुक्ला यांनी देशमुख यांच्या भावास बाहेर बोलविले. त्यावेळी बाहेरून आलेल्या दहा जणांनी काठ्या, धारदार शस्त्राने अभिजीत देशमुख यांच्यावर हल्ला केला. लता आणि धीरजना मारहाण केली

आणखी वाचा-ठाणे ते दिवा आणि एरोली भागात तीन वर्षांत सुमारे चार हजार मोबाईल चोरी, दररोज सरासरी तीन ते चार मोबाईलची चोरी

केंद्रीय मोटार वाहन कायद्याप्रमाणे अंबर दिवा कोणी लावावा आणि कोणी लावू याचे निर्देश आहेत. या निर्देशाचे उल्लंघन शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी केले आहे. त्यांच्या वाहनाचा विमा, पीयुसी चार वर्षापूर्वी संपले आहे. हे वाहन ते नियमाबाह्यपणे रस्त्यावर वापरत होते. त्यांना साडे नऊ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांचे खासगी वाहन अंबर दिव्यासह जप्त करण्यात आले. -आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private vehicle of government official akhilesh shukla from kalyan seized mrj