९० बसगाडय़ा कंत्राटी तत्त्वावर चालवणार; खासगी वाहक, चालकांचीही नियुक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या अनेक वर्षांपासून रडतखडत सुरू असलेली कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाची (केडीएमटी) बससेवा आता अखेर खासगीकरणाच्या वाटेने जाणार आहे. पहिल्या टप्प्यात केडीएमटी उपक्रमाच्या ताफ्यातील ९० बसगाडय़ा कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आगारात उभ्या राहणाऱ्या बस रस्त्यावर चालवता याव्यात, यासाठी खासगी पद्धतीने वाहक, चालक नेमण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात केडीएमटीची बससेवा अधिक सक्षम होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीची लोकसंख्या एव्हाना १२ लाखांच्या पलीकडे पोहचली असून २७ गावे तसेच कल्याण, टिटवाळा परिसराचा झपाटय़ाने होणारा विस्तार लक्षात घेता ही संख्या आणखी वाढेल, असे चित्र आहे. सद्य:स्थितीत या दोन्ही शहरातील अंतर्गत वाहतुकीचा डोलारा रिक्षा सेवेवर अवलंबून असतो. मात्र, रिक्षाचालकांकडून मनमानी भाडेआकारणी होत असल्याने प्रवाशांना ही सेवा महागात पडते. महापालिकेची स्वत:ची परिवहन सेवा आहे. मात्र, सुरुवातीपासूनच ती प्रवाशांना योग्य सेवा पुरवण्यात अपयशी ठरली आहे. परिवहन उपक्रमाच्या सक्षमीकरणाची गरज वेळोवेळी बोलून दाखविण्यात आली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे यासंबंधी ठोस पावले उचलली जात नव्हती. मात्र, आता प्रशासनाने यासाठी कंबर कसली आहे.

यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडत असताना स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी परिवहन उपक्रमाचे खासगीकरण केल्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. यानंतर खासगीकरणाच्या हालचालींना वेग आला असून प्रशासनाने काढलेल्या एका निविदेनुसार ९० बसेस भाडेपट्टय़ावर चालविल्या जाणार आहेत. सद्य:स्थितीत केडीएमटीच्या ताफ्यात २१८ बसेस आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे जेमतेम ७० बसेस आगाराबाहेर काढणे शक्य होते. त्यामुळे महापालिकेच्या ताफ्यातील ९० बसगाडय़ांचे पूर्ण खासगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली. मनुष्यबळाअभावी बंद असलेल्या बसगाडय़ा सुरू करण्यासाठी चालक आणि बाहकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.

नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी केडीएमटीचे खासगीकरण करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बस रस्त्यावरून धावतील. याचा फायदा प्रवाशांना होईल. प्रवाशांचे व्यापक हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

देवीदास टेकाळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम, कल्याण