प्रिया मराठे
‘वाचनाने व्यक्तिमत्त्व घडते’ हा विचार शाळेत असल्यापासून आपण ऐकत असतो. अर्थात हा विचार प्रत्येकाला पटेलच असे नाही. या विचाराचा अवलंब फार कमी लोक करताना आपल्याला दिसून येतात. माझ्या बाबतीत मात्र वाचन हाच मोठा गुरू आहे. शालेय जीवनात मी इतरांप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तके वाचली. मात्र खऱ्या अर्थाने माझ्या वाचनाची सुरुवात झाली आणि पुस्तकांविषयी मनात निर्माण झाली ती महाविद्यालयीन दिवसांमध्ये. महाविद्यालयीन वयात माझे कलेच्या क्षेत्रात पदार्पण झाले. मला कुणी विचारले तुला वाचनाची आवड आहे का तर त्यावेळी मला एकच उत्तर द्यावेसे वाटेल ते म्हणजे वाचन माझ्यासाठी एक छंद किंवा विरंगुळ्याचा भाग नसून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे.
अभिजात वाचन कलेचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळाले. माझ्या आईकडे नवनव्या पुस्तकांचा संग्रह असतो. तिने एखादे पुस्तक वाचून संपवल्यावर, त्या पुस्तकातील विचार ती मला सांगत असे. त्यामुळे वाचनाची गोडी वाढली. काही इतर पुस्तके आई मला वाचण्यासाठी सुचवते. प्रामुख्याने मला साहित्य प्रकारातील रहस्य कथा, गूढ कथा अशा प्रकारचे साहित्य वाचायला अधिक आवडते. मध्यंतरी मी एका ग्रंथालयात वाचनासाठी सभासद झाले होते. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे ग्रंथालयात जाणे शक्य होत नव्हते. यासाठी घरीच माझा पुस्तकांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. एखाद्या प्रदर्शनात किंवा नवीन ठिकाणी गेल्यावर मी हमखास एक नवीन पुस्तक विकत घेते. स्वत: पुस्तक खरेदी करत असल्यामुळे आवडते पुस्तक कोणत्याही वेळी वाचता येते. ऑनलाइन माध्यमाद्वारे पुस्तक वाचण्यापेक्षा मला प्रामुख्याने हातात घेऊन पुस्तक वाचायला जास्त आवडते. रहस्यमय पुस्तकांसोबतच मला इंग्रजीमधील प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्याही वाचायला आवडतात. मराठी पुस्तकांपेक्षा माझे इंग्रजी वाचन अधिक जास्त आहे. पावलो कोएल्हो यांची ‘द अलकेमीस्ट’, ‘द विनर स्टँन्ड्स अलोन’, ‘द ब्रिडा’, ‘द झहीर’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आणि ही पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. सिडने शेल्डन या लेखकाची अनेक पुस्तके वाचनात आली. कादंबरी सोबतच हुसेन झैदी यांची ‘डोंगरी टू दुबई’ यांसारख्या अनेक वास्तववादी कथाही मी वाचल्या आहेत. डय़ान ब्राऊन यांची डिसेप्शन पॉइंट हे पुस्तक आवडले. अमिष त्रिपाठी यांची मेलुहा, नागाज यांसारख्या शिवा ट्रायोलॉजीवर आधारित कादंबऱ्याही वाचनात आल्या आहेत. तसेच डेव्हिड रोबर्ट यांची ‘शांताराम’ ही कादंबरी माझ्या संग्रहात आहे, मार्क बिलींघम यांचे ‘इन द डार्क’ हे पुस्तक वाचलेले आहे. जॉन ग्रीशीम यांचे ‘द किंग ऑफ टोर्तास’ हे पुस्तक मी वाचलेले आहे. तसेच अॅडोल्फ हिटलर यांचे ‘मेईन क्राम्फ’ हे आत्मचरित्र माझ्या संग्रहात आहेत. अनेकदा कामाच्या व्यापात वाचनासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी प्रवासात फावल्या वेळेत मी माझी वाचन कला जोपासते. सध्या मी भगवद्गीता, कुराण आणि बायबल वाचण्याकडे माझा अधिक वेळ देत आहे. अलीकडे बाहेर निघताना मी नक्कीच एक तरी पुस्तक आपल्या जवळ बाळगते. शूटिंगच्या वेळी सेटवर अनेकदा मी माझ्या सहकलाकारांना अनेक पुस्तके सुचवते. सेटवर आम्हा कलाकार मंडळींमध्ये एखाद्या पुस्तकावर नेहमीच चर्चा होत असते. एकदा ग्रंथालयातून आणलेले पुस्तक मी मेकअप रूममध्ये तसेच विसरून गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी हेअर ड्रेसरने मला ते परत केले. पुस्तके एक वेगळे जीवन आहे. वाचनात येणारे प्रत्येक पुस्तक हे नव्याने काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे तंत्रज्ञानात जरी वाढ होत असली तरी प्रत्येकाने हातात प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचले पाहिजे आणि हाच खरा आनंदादायी अनुभव आहे.
शब्दांकन – हृषीकेश मुळे, युवा वार्ताहर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा