ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली असून ८१ अनधिकृत शाळांविरोधात पालिका प्रशासनाने पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहे. यानुसार,६८ शाळांवर गुन्हे दाखल तर, १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. याशिवाय, या शाळांची नळ जोडणी खंडित करण्यात आली असून शाळांच्या बांधकामावर अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामुळे या शाळा चालकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदेशीरपणे शाळा सुरू असल्याची बाब काही वर्षांपुर्वी पुढे आली होती. या शाळांना महापालिकेकडून सातत्याने नोटीसा बजावण्यात येत आहेत. तरीही संस्था चालक शाळा सुरूच ठेवत असल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होत होती. दरम्यान, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिृकत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यात या शाळांची नोंदणी नाही. काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत. काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत सुरू आहेत, अशी माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली. या सर्व अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना ५२ कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचेही उपायुक्त सांगळे यांनी सांगितले. अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहेत. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरुद्ध कार्यवाही सुरू केलेली आहे. आतापर्यंत ३२ अनधिकृत शाळांची नळ जोडणी पालिकेने खंडित केली आहे. या अनधिकृत शाळांच्या बाबतीत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामाच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

विद्यार्थ्यांचे समायोजन

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८१ अनधिकृत शाळा असून त्यात १९७०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळांत समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्याचाही विचार केला जात आहे. त्यास १९ खाजगी शाळांनी तयारी दाखवली असल्याचे सांगळे यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांचा मुद्दा नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. त्यावेळी आमदारांच्या सुचनेनुसार या शाळांची कागदपत्रे तपासून ज्या शाळा नियमात बसू शकतील, तर त्यांना तशी संधी देण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त राव यांनी घेतली आहे. ८१ पैकी ५ शाळांनी त्यादृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उर्वरित ७६ शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांना आणखी एक संधी द्यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.

अनधिकृत शाळा

प्रभाग- शाळा संख्या- विद्यार्थी संख्या

दिवा- ६५ – १६४३७
मुंब्रा- ८ – १८२६
माजिवडा-मानपाडा – ३ – ५६२
कळवा- ३ – ४१५
उथळसर- २ – ४६८
एकूण- ८१ – १९७०८