लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चौक, सिध्दार्थनगर ते तिसगाव या यु टाईप रस्त्याचे ८० फुटाचे रुंदीकरण करण्याच्या कामाला कल्याण डोंबिवली पालिकेने प्रारंभ केला आहे. नागरिकांच्या हरकती, सूचना, बाधितांचे पुनर्वसन या पहिल्या टप्प्यातील कामे प्रशासनाने हाती घेतली आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कल्याण पूर्वेतील वाहतूक कोंडीला आळा बसण्यास साहाय्य होणार आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये काटेमानिवली चौक ते तिसगाव नाका हा यु टाईप आकाराचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याची रुंदी आराखड्याप्रमाणे ८० फूट आहे. पूर्वीपासूनची घरे, अतिक्रमणे यामुळे काही ठिकाणी हा रस्ता ४० फूट तर काही ठिकाणी ६० फुटाचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहन कोंडी होते.
आणखी वाचा- अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाण्याचा ठणठणाट
या रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याला बाधित होणाऱ्या बांधकामांवर पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमध्ये व्यापारी संकुले, निवासी घरे बाधित होणार आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने नागरिकांच्या हरकती, सूचना मागविल्या आहेत. १८ मेपर्यंत नागरिकांना पालिकेकडे आपली मते मांडण्याची संधी उपलब्ध आहे. बाधित नागरिकांची मते विचारात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करुन या रस्ते कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे रस्ते काम सुरू करण्यापूर्वीच्या रस्ते सिमांकन कामाला नगररचना विभागाने सुरूवात केली आहे. हा महत्वपूर्ण रस्ता विनाअडथळा पूर्व व्हावा. यासाठी कल्याण पूर्व विकास संघटना स्थापन करण्यात आली आहे, असे रहिवासी आनंद गायकवाड यांनी सांगितले.
आणखी वाचा-कल्याण: काटई गावात अमृत योजनेतील नवीन जलकुंभाचा भाग कोसळला
या रस्ते कामामुळे काही रहिवासी, व्यापारी बाधित होणार आहेत. त्यांच्यामध्ये या कामामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमची बांधकामे तोडल्यानंतर त्याचा मोबदला किंवा योग्य जागी आमचे पुनर्वसन होईल की नाही असे प्रश्न हे रहिवासी उपस्थित करत आहेत. कोणावरही अन्याय न करता प्रत्येकाचे म्हणणे ऐकून हे काम सुरू केले जाईल, असे पालिका अधिकारी सांगतात.
“ कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्त्याने बाधित होणाऱ्या नागरिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन झाले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या पुनर्वसन धोरणात कोणावरही अन्याय होणार नाही असे नियोजन आहे. त्यामुळे यु टाईप रस्त्याच्या कामाला कोणाचाही विरोध नसेल फक्त बाधितांचे पुनर्वसन करावे. मग काम सुरू करावे.” -गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व.