जळगाव : आदिवासी समाजाच्या विकासासाठी कौशल्य विकासाची तसेच सूक्ष्म आणि लघू उद्योगांची गरज आहे. नंदुरबार येथील आदिवासी अकादमीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विविध प्रस्तावांचा राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी येथे दिली.विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव तसेच आदिवासी समुदायाच्या संशोधन पध्दती आणि तंत्रज्ञान, या दोन विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन शुक्रवारी मंत्री प्रा.उईके यांनी केले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. विचारधारा प्रशाळा अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकांनद अध्ययन व संशोधन केंद्र, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा तसेच आदिवासी अकादमी यांच्या वतीने या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री प्रा. उईके यांनी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कामावर आपण प्रभावित झालो असून विद्यापीठाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे नमूद केले. कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांनी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तसेच अभ्यासक्रमांची माहिती दिली. विवेकानंद संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.अतुल बारेकर, आदिवासी अकादमीचे प्रभारी संचालक प्रा. के. एफ. पवार, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाची भूमिका मांडली. सामाजिक कार्यकर्ते वैभव सुरंगे यांनी आदिवासी संस्कृतीची माहिती दिली.
दरम्यान, विद्यापीठाच्या वतीने सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी सन्मान योजनेअंतर्गत नऊ विद्यार्थिनींचा सन्मान प्रा.उईके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितिन झाल्टे, समाजसेवक चैत्राम पवार, प्रा. म. सु. पगारे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.कविता सोनी आणि खेमराज पाटील यांनी केले.