सध्या मोबाईल हा तुमच्या आमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे. सोशल मीडिया तर नित्यनियमाने लोक पाहतात. मात्र त्याचा अतिरिक्त वापर मानसिक अस्थैर्य आणणारा ठरतो आहे असं मत प्राध्यापिका प्रज्ञा पंडित यांनी डोंबिवली येथील कार्यक्रमात व्यक्त केलं. तसंच डिजिटल डिटॉक्स महत्त्वाचा आहे असंही त्या म्हणाल्या.
मोबाईलचा अतिरिक्त वापर मानसिक व्याधींचं कारण-प्रा. प्रज्ञा पंडित
“मोबाईलचा अतिरिक्त वापर हे मानसिक अस्थैर्याचे कारण ठरते. अनेक मानसिक व्याधी आणि त्यातून उद्भवणाऱ्या शारीरिक समस्यांचे मूळ हे या तंत्रज्ञानाच्या अतिवापरात आहे,” असे स्पष्ट आणि ठाम वक्तव्य प्रा. डॉ. प्रज्ञा पंडित यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. जैन कासार मंडळ, मुंबई यांच्या वतीने डोंबिवलीतील श्री सिद्धिविनायक सभागृहात भगवान महावीर जन्मकल्याणक उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. “डिजिटल डिटॉक्स – सोशल मीडियाच्या मर्यादित वापराचे फायदे” या विषयावर त्यांच्या प्रभावी शैलीतील सादरीकरणाने उपस्थित श्रोते भारावून गेले.
डिजिटल डिटॉक्स महत्त्वाचा-प्रज्ञा पंडित
आधुनिक युगातील तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि सोशल मीडियामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक, सामाजिक परिणामांची सखोल मांडणी त्यांनी केली. मर्यादित मोबाईल वापराचे फायदे उलगडताना त्यांनी “डिजिटल डिटॉक्स जीवनाला दिशा देतो” असेही ठामपणे नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन कासार मंडळ मा.उपाध्यक्षा श्रीमती सविता चंद्रकांत साळवी होत्या. मंडळाच्या उपाध्यक्षा आणि कार्यक्रम समन्वयक म्हणून सौ. आशा मांगले यांनी अत्यंत नेटके आणि परिणामकारक नियोजन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अध्यक्ष श्री. अनिल बीजितकर आणि उपाध्यक्षा श्रीमती दिपाली महिंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अत्यंत संयत आणि आकर्षक पद्धतीने श्री. राजेश भडाळे आणि सौ. जयश्री मांगले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. अरुणा मांगले यांनी केले. महावीर जयंतीनिमित्त झालेला हा कार्यक्रम सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक ठरला.