डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन येऊन स. वा. जोशी शाळेजवळ डावे वळण घेऊन ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मंगळवारपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन येऊन ठाकुर्ली-चोळेगाव-९० फुटी रस्त्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने स. वा. जोशी शाळेपुढील नाना कानविंदे चौक येथून डावे वळण घेऊन पंचायत बावडी, महिला समिती शाळामार्गे इच्छित स्थळी जातील, असे गित्ते यांनी सांगितले.डोंबिवली पश्चिमेतून येणारा लहान, अवजड वाहन चालक ठाकुर्ली उड्डाण पुलावरुन जोशी शाळा येथे उतरल्यानंतर मधला मार्ग म्हणून तो तेथील आठ फूट रुंदीच्या अरुंद वळण रस्त्यावर वाहन फिरवून ठाकुर्ली रेल्वे फाटकमार्गे, चोळेगावातून इच्छित स्थळी जात होता. जोशी शाळेजवळील पुलाजवळील वळण अरुंद असल्याने या वळणावर दररोज ठाकुर्लीतून येजा करणाऱ्या वाहनांची कोंडी होत होती. त्याचा फटका इतर भागात जाणाऱ्या वाहन चालकांना दररोज बसत होता. याशिवाय वळण घेत असताना वाहने एकमेकांना घासत किंवा प्रसंगी ठोकर देत असल्याने वाहन चालकांमध्ये नियमित वादाचे प्रसंग होत होते.
हेही वाचा >>>ठाणे पालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापुर्वीच मिळाली पुस्तके; आयुक्तांच्या दट्यामुळेच हे घडल्याची चर्चा
या अरुंद वळण रस्त्याविषयी वाहतूक विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची तातडीने दखल घेऊन डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी मंगळवारी प्रत्यक्ष वळण रस्त्याची पाहणी करुन ठाकुर्लीकडे जाणाऱ्या चालकांना पुलाजवळील वळण मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाकुर्लीतून डोंबिवली पश्चिमेत, पश्चिम रेल्वे स्थानक, कानविंदे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गिका उपलब्ध होणार आहे, असे गित्ते यांनी सांगितले.शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना कोंडीचा फटका नको म्हणून वाहतूक विभागाने विशेष दक्षता मोहीम सुरू केली आहे.