ठाणे : शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक उभारणीच्या प्रकल्पाला शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा करूनही कागदावर असलेला हा प्रकल्प पालिकेने गुंडाळल्याचे स्पष्ट होत आहे.शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी घराघरात शिवसेना पोहचविण्याचे काम केले. ठाणे जिल्ह्यात दिघे यांच्या नावाचे मोठे वलय होते आणि त्यांचे जिल्ह्यावर वर्चस्व होते. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू होते.

आनंद दिघे यांचे निधन २००१ साली झाले. परंतु निधनानंतरही त्यांच्या नावाचा करिष्मा कायम आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाचा वापर होताना दिसून येतो. त्यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटही प्रदर्शित झाला. दिघे यांचे ठाणे जिल्ह्यातील योगदान लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात ठाण्यामध्ये दिघे यांचे स्मारक उभारण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले होते. यानुसार, तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी गेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात दिघे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. उपवन येथील महापौर निवास या वास्तुमध्ये आनंद दिघे यांचे स्मारक उभारण्याचे प्रस्तावित करत त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधीची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी सादर केलेल्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात स्मारकाचा उल्लेखच केलेला नसून यामुळे हे स्मारक गुंडाळ्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

आनंदाश्रम परिसर सुधारणा

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या कार्यालयास आनंदाश्रम म्हटले जाते. या आश्रमाच्या परिसराचा सौंदर्यात्मक विकास करण्यासाठी सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते, दुभाजक, शोभिवंत दिवे, फलक, भितीचित्रे तसेच इतर कामे करण्याची घोषणा पालिकेने गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात करत १ कोटीच्या निधीची तरतुद केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात हा प्रकल्प कायम ठेवत त्यासाठी ३ कोटींच्या निधीची तरतुद केली आहे.

Story img Loader