ठाणे : ठाणे येथील किसननगर भागातील क्लस्टर योजनेचा शुभारंभ तसेच दिवा परिसरातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे भुमीपुजन व उदघाटनांचा बार काही दिवसांपुर्वीच उडाला असतानाच, त्यापाठोपाठ आता राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्ताने येत्या २५ जून रोजी ठाण्यात विविध प्रकल्पांचे भुमीपुजन आणि उदघाटन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात लोकोपयोगी प्रकल्पांचा धडाका लावल्याचे चित्र असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमांच्यानिमित्ताने शिवसेना पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करीत आहे.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातून मुख्यमंत्री शिंदे यांना मोठे समर्थन मिळाल्याचे दिसून आले होते. या जिल्ह्यातील शहरांमध्ये विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्याचबरोबर सुशोभिकरण तसेच इतर लोकोपयोगी प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. काही प्रकल्पांची कामे पुर्ण झाली आहेत तर, काही कामांना सुरूवात होणार आहे. या प्रकल्पांचे उदघाटन आणि लोकार्पणांचा धडाका शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून लावला आहे.
हेही वाचा >>> पथदिव्यांच्या जिवंत वीज वाहिनीमुळे डोंबिवलीत रहिवाशाचा मृत्यू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर योजनेचा शुभांरभ नुकताच किसननगर येथे झाला. त्यानंतर लगेचच दिवा परिसरातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे भुमीपुजन व उदघाटनांचा बार उडाला. त्यापाठोपाठ आता ठाण्यातील विशेषत: ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचे भुमीपुजन आणि लोकार्पण येत्या २५ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत वाईन शाॅपमध्ये चोरी करणारे चोरटे अटकेत
रेप्टोकोसच्या सुविधा भुखंडावर स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालय, उपवन येथे धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे जीमखाना, सिंधूताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कान्होजी आंग्रे संग्राहलय, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल, तरण तलाव, विविध स्माशान भुमी नुतनीकरण आणि विहिरींचे संवर्धन अशा प्रकल्पांचे भुमीपुजन होणार आहे. तर, शाहु, फुले, आंबेडकर भवन, स्वर्गीय बाबुराव सरनाईक जिम्नाॅस्टीक सेंटर तसेच इतर प्रकल्पांचे भुमीपुजन करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा आम्हाला मतदार संघातील विकासकामांसाठी निधी मिळाला नव्हता. परंतु शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याच निधीतील प्रकल्पांचे भुमीपुजन आणि लोकार्पण येत्या २५ जून रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. २५ जून रोजी राज्य सरकारला एक वर्ष पुर्ण होत असून त्याचदिवशी योगायोगाने हा कार्यक्रम होत आहे. -प्रताप सरनाईक आमदार, ओवळा-माजिवाडा