राष्ट्रीय एकात्मता, पोलीस मित्र संकल्पनांचा उद्देश
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, पोलीस मित्र या संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागातर्फे कल्याण डोंबिवलीतील शाळकरी विद्यार्थी, शहरातील विविध क्षेत्रातील जाणकार, शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी, वाहतूक परिवहन, वाहतूक अधिकारी, लोकप्रतिनिधींची शहरांतून प्रचार फेरी काढण्यात आली होती.
कल्याणमधून काढण्यात आलेली प्रचार फेरी सुभाष चौक, पारनाका, लालचौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौक ते पुन्हा सुभाष मैदानापर्यंत नेण्यात आली. या प्रचार फेरीदरम्यान विद्यार्थी, सहभागी सामान्यांनी पर्यावरण बचाव, बेटी बचाव, पाणी वाचवा असे संदेश घोषणांच्या माध्यमातून दिले. या प्रचार फेरीत सुमारे चार ते पाच हजार सर्वसामान्य सहभागी झाले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार, उपायुक्त संजय जाधव यांच्या संकल्पनेतून ही प्रचार फेरी काढण्यात आली होती. आयुक्त ई. रवींद्रन, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक आदी अधिकारी प्रचारफेरीत सहभागी झाले होते. डोंबिवलीत रामनगर, विष्णुनगर, मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्यांतर्फे गणेश मंदिर ते फडके रोड, शिवाजी पुतळा, केळकर रोड ते जोंधळे हायस्कूलपर्यंत प्रचार फेरी काढण्यात आली होती. या फेरीत शहरातील विविध शाळांतील मुले, शिक्षक, पोलीस मित्र तसेच अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा