रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना त्रास; खड्डे आणि वाहतूक कोंडीपाठोपाठ आता आरोग्याच्याही तक्रारी
जागोजागी होणारी वाहनकोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे, उड्डाणपुलांच्या रखडलेल्या कामांमुळे अडलेल्या वाटा यामुळे डोंबिवलीकर अक्षरश मेटाकुटीस आले असताना गेल्या काही दिवसांपासून शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांचा जीव गुद्मरू लागला आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार डोंबिवलीकरांवर आश्वासनांची खैरात वाटत असताना रोजच्या जगण्याचे प्रश्न दिवसेंदिवस उग्र रुप धारण करू लागल्याने येथील मतदार कमालिचा अस्वस्थ होऊ लागला आहे. मतदानाची तारीख जवळ येऊनही शहरातील अनेक भागातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असून अर्धवट भरलेल्या खड्डय़ांमधील खडी, मातीमुळे हवेचे प्रदूषणही टोकाला पोहचले आहे.
शहरातील विधासभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना विविध राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस मतदारांवर कोसळत आहे. साधारणपणे निवडणुका जवळ आल्यावर तोंडदेखले का होईना सत्ताधारी पक्षाकडून महापालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधांची पेरणी केली जाते असा सर्वसामान्य डोंबिवलीकरांचा अनुभव आहे. यंदा मात्र नेमके उलट चित्र येथील मतदारांना पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरभर पडलेल्या खड्डय़ांविषयी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर हे खड्डे युद्धपातळीवर बुजविले जातील अशी येथील रहिवाशांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अनेक भागातील खड्डे जैसे थे असून जे बुजविले जात आहेत ती कामेदेखील वरवरची मलमपट्टी ठरत असल्यामुळे रहिवाशांमध्ये रोष वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील धूलिकणांचे प्रदूषण वाढल्याने बालकांमध्ये श्वसनाचे आजार बळावत असल्याची माहिती डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या सर्वेक्षणात समोर आली होती. अशातच शहरातील रस्त्याची सुरू असलेली कामे आणि विविध ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील मानपाडा, बाजीप्रभू चौक, मंजुनाथ शाळा, घारडा सर्कल, महात्मा फुले चौक आणि ठाकुर्ली या भागातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात माती पसरली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे मोठय़ा प्रमाणात धूळ उडत असून धुळीमुळे दुचाकीचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच शहरातील पदपथ अतिक्रमणामुळे अडले असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पादचाऱ्यांनाही या धुळीच्या रस्त्यातूनच वाट काढावी लागत आहे. शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात धूळ उडत असल्याने श्वसनाचे विकार बळावण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
घरातही धूळ
डोंबिवली शहरातील रस्त्यांलगत असलेल्या घरांमध्येही मोठय़ा प्रमाणात धूळ पसरत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळीचे प्रमाण वाढले असल्याचे डोंबिवलीतील रहिवासी ऋ तिक कदम याने सांगितले. परिणामी घरातील वस्तूंवर मोठय़ा प्रमाणावर धूळ साचत असल्याने दिवसातून तीन वेळा घरात साफसफाई करावी लागत असल्याचे काही गृहिणींनी सांगितले. डोंबिवली शहरातील पूर्वेकडील शिळफाटा – मानपाडा रस्त्यालगत गृहसंकुले उभी राहत आहेत.दुचाकीस्वारांना या भागातून प्रवास करताना नाकाला रुमाल बांधून प्रवास करत आहेत.
रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित भरले जात नाहीत. त्याची धूळ सर्वत्र पसरत असून त्यामुळे रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. – पुरुषोत्तम आठलेकर, समाजसेवक, डोंबिवली
पावसाळ्यात शहरातील खड्डे सिमेंट आणि खडी टाकून भरण्यात आले होते. ऊन पडू लागल्याने हे खड्डे उखडत असून वाहनांच्या वर्दळीने धूळ उडते. मात्र, आता महापालिकेतर्फे डांबरीकरणाची कामे हाती घेतली आहेत. – सपना कोळी, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महापालिका