लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : अनेक वेळा नोटिसा देऊनही टिटवाळा अ प्रभागातील अनेक मालमत्ताधारकांनी कराची थकित रक्कम पालिकेत भरणा केली नाही. त्यामुळे पालिकेच्या अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी विशेष मोहीम राबवून टिटवाळा, आंबिवली भागातील मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दोन कोटी किमतीच्या मालमत्तांना टाळे लावले आहे.

टाळे लावलेल्या मालमत्तांमध्ये व्यापारी गाळे, दवाखाने, व्यापारी संकुल, औषध दुकाने, व्यापारी आस्थापना यांचा समावेश आहे, असे अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी सांगितले. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त स्वाती देशपांडे, साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांनी प्रभागातील कर विभागाच्या कर्मचाऱ्यांना मालमत्ता कर वसुलीचे आदेश दिले आहेत. कर थकबाकीदारांकडून प्राधान्याने कर वसुली करा, अन्यथा त्यांच्या मालमत्तांना टाळे लावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर

अ प्रभागातील टिटवाळा, मांडा, आंबिवली, अटाळी भागातील अनेक मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराची अनेक वर्षाची थकबाकी आहे. ही थकित रक्कम संबंधितांनी भरणा करावी म्हणून अ प्रभागातून या थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकीदार मालमत्ता कराची थकित रक्कम भरणा करत नाहीत. गेल्या आठवड्यापासून अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र साळुंखे, विजय शुक्ल, नीलेश मुंडे, धनंजय भगरे, प्रशांत घुगे, शिवाजी परते, उस्मानभाई शेख यांच्या पथकाने टिटवाळा परिसरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे लावले आहे.

बल्याणी येथे एका डॉक्टरचा दवाखाना असलेल्या व्यापारी गाळ्याची मालमत्ता कराची एक लाख ४५ हजाराची थकबाकी भरणा करण्यात आली नव्हती. हा दवाखान्याला पथकाने टाळे लावले आहे. कर थकबाकीमुळे एका औषधाच्या दुकानाला टाळे लावले आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे, असे साहाय्यक आयुक्त रोकडे यांनी सांगितले.

आणखी वाचा-माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू

अ प्रभागातील मालमत्ताधारकांना थकित कराच्या रकमा भरण्याच्या यापूर्वीच नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा देऊनही कर भरणा न केल्याने अशा थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मालमत्तांचा पाणी पुरवठा खंडित करणे, त्या मालमत्तांचा लिलाव करणे या प्रक्रिया वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सुरू करणार आहोत. -संदीप रोकडे, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, टिटवाळा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Property tax defaulters properties seized in titwala mrj