पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव सादर; गोवा पोलिसांच्या धर्तीवर निर्णय
पर्यटनासाठी समृद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी गोवा पोलिसांच्या धर्तीवर पर्यटन पोलीस तयार करण्याचा गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पालघरसह वसई-विरारमधील पर्यटनाच्या विकासासाठी या पर्यटन पोलिसांचा मोठा फायदा होणार आहे.
सध्या शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस अशी पोलिसांची विभागणी आहे. त्यात सायबर पोलीस, सागरी पोलीस अशी नवीन पोलीस ठाणी स्थापन होत आहेत. या पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्त, गुन्ह्यांची उकल तसेच कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागते. राज्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असते. स्थानिक पोलिसांकडे असलेले अपुरे पोलीस बळ, साधनसामग्रीचा अभाव आणि कामाची व्यस्तता यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र वेळ देता येत नाही. त्यामुळे मुंबईसह कोकण, औरंगाबाद, नागपूर येथे पर्यटन पोलीस पथक (टुरिझम पोलीस) स्थापन करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. गोव्याच्या धर्तीवर पर्यटन पोलीस तयार करण्याचा मानस आहे. त्या पोलिसांना खास प्रशिक्षण दिले जाणार असून साधनसामग्री पुरवली जाणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रभात यांनी हा प्रस्ताव सादर केलेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा