कल्याण – कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील उच्चभ्रूंच्या वसाहतीत मसाज केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याचा प्रकार खडकपाडा पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या केंद्राच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या मसाज केंद्र मालक, व्यवस्थापक आणि अन्य एका कर्मचाऱ्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल येथील राॅक माऊंट इमारतीत मिडास वेलनेस स्पा नावाने हे मसाज केंद्र चालविले जात होते. या मसाज केंद्राचे चालक सुनील चव्हाण, व्यवस्थापक जुगेशकुमार महातो (रा. उत्तरप्रदेश), नितीश कुमार कुशवाह (रा. झारखंड) यांच्या विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार गणेश जाधव यांनी स्त्री व मुली अत्याचार प्रतिबंधक आणि भारतीय न्याय संहिता कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. या केंद्रात छापा टाकल्यानंतर पोलिसांना डोंबिवली, भिवंडी येथील महिला आढळून आल्या. या मसाज केंद्रात आलेल्या ग्राहकाकडून केंद्र चालक पाच हजार रूपये शुल्क घेत होते. या शुल्कातील दोन हजार शरीर संबंध करणाऱ्या महिलेला दिले जात होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

खडकपाडा सर्कल येथील मिडास वेलनेस स्पा या मसाज केंद्रात मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविता जात असल्याच्या गुप्त तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले. या केंद्रावर छापा टाकण्याची तयारी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनखाली केली. गेल्या महिन्यात पोलीस बनावट ग्राहक घेऊन मिडास वेलनेस स्पा केंद्र पोहचले. या केंद्राच्या बाहेर साध्या वेशातील पोलिसांचा सापळा लावण्यात आला.

बनावट ग्राहक मसाज केंद्रात गेल्यानंतर तेथे त्यांच्याकडे चालकांकडून पाच हजार रूपयांची मागणी करण्यात आली. त्यांना शरीर संबंधासाठी महिलेची व्यवस्था करण्यात आली. बनावट ग्राहकाने ठरल्या इशाऱ्याप्रमाणे सापळा लावून बसलेल्या पोलिसांना इशार करताच पोलीस मिडास मसाज केंद्रात आले. त्यांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. केंद्रात दोन महिला बंद खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. या केंद्रात मसाज केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जातो याची खात्री पटल्यावर पोलिसांनी केंद्र चालकांनी स्वताच्या फायद्याकरिता महिलांना ग्राहकांबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करण्यास सांगितले. या माध्यमातून पैसे मिळवून त्याच्या स्वतासाठी उपयोग करून घेतला म्हणून पोलिसांनी केंद्र चालकासह दोन कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल भुजबळ, हवालदार एम. जे. पाटील, पावस्कर, बेंडकोळी यांनी ही कारवाई केली.

Story img Loader