वरकरणी लोकांच्या विविध कार्यक्रमांचे व्यवस्थापन करून देणारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, मात्र आतून मात्र वेश्याव्यवसाय. काशिमीरा परिसरात राहणाऱ्या एका जागरूक नागरिकामुळे सुरू असलेले सेक्स रॅकेट काशिमीरा पोलिसांनी उद्ध्वस्त केले. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या आडून हे रॅकेट चालविणाऱ्या महिला मॉडेलला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या असून या व्यवसायात अडकलेल्या चार तरुणींची सुटका करण्यात आली.
मीरा रोडे येथे साहील खान समाजमाध्यमावरून ठाणे येथील कशीश दुलानी या महिलेच्या संपर्कात आले. कशीश हिने आपण मॉडेल असून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीदेखील चालवत असल्याचे साहील यांना सांगितले. कोणत्याही संमारंभाच्या आयोजनासाठी तरुणी हव्या असतील, तर त्या आपण देऊ. त्याशिवाय या तरुणी पाहिजे तो समझोता करण्यासाठीही तयार असल्याचे तिने साहिल यांना सांगितले. या प्रकरणात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय साहील खान यांना आला. त्यांनी ही बाब लगेचच काशिमीरा पोलिसांच्या कानावर घातली. पोलिसांनी एक पथक निर्माण करून सापळा रचला. त्यांच्या सांगण्यानुसार साहील यांनी पुन्हा कशीश हिच्याशी संपर्क साधला. प्रत्येक तरुणीसाठी बारा हजार रुपयांचा सौदा नक्की करण्यात आला. ठरल्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी कशीश आपल्या साथीदारांसह चार तरुणींना घेऊन मीरा रोड येथील हटकेश परिसरात आली. पोलिसांनी तिला अटक केली. या वेळी सुटका करण्यात आलेल्या तरुणींची पुनर्वसन केंद्रात रवानगी करण्यात आली.

Story img Loader