दुर्घटनेला वर्ष लोटल्यानंतरही भिंतीची उभारणी नाही
मध्य रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या पारसिक बोगद्यावरील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेला येत्या पावसाळय़ात वर्ष होत आले तरी, या बोगद्याच्या सुरक्षेविषयी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. बोगद्याजवळ संरक्षण भिंत उभारण्यात न आल्याने डोंगरावरील अतिक्रमणांच्या भारामुळे हा बोगदा खचण्याची भीती आहे. बोगद्यावरील मातीचा राडारोडा खाली रुळांवर कोसळून रेल्वे दुर्घटना होण्याचीही भीती आहे. परंतु, महापालिका प्रशासन व रेल्वे यांच्याकडून याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत.
बेकायदा बांधकामे, कचऱ्याचा विळखा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे पारसिक बोगद्याच्या झालेल्या दुरवस्थेविषयी ‘लोकसत्ता’मध्ये वारंवार प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जून २०१६ ला पारसिक बोगद्यावरील मुंब्राजवळील भागात पावसामुळे संरक्षण भिंतीचा काही भाग बोगद्यावर कोसळला होता. सुदैवाने हा भाग रेल्वे रुळांवर कोसळला नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेनंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यासाठी तब्बल चार तास लागले होते. इतक्या मोठय़ा दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग येईल असे वाटले होते. मात्र, आता एक वर्ष होत आले तरीही याबाबतीत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
जून महिन्यात दुर्घटना झाल्यानंतर बोगद्यावरील कचरा आणि अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली होती. मात्र, बांधकामे सोडाच, येथील कचऱ्याची विल्हेवाट लावणेही पालिकेला शक्य झालेले नाही. त्यामुळे बोगद्याच्या दोन्ही टोकांवरील परिसरात कचऱ्याचे साम्राज्य आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही अजूनही संरक्षण भिंतीचा मूहूर्त प्रशासनाला सापडलेला नसल्याने पुन्हा एकदा पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अद्याप या बोगद्याची अवस्था बिकट असल्याने गाडय़ा मंद गतीने धावतात. त्यामुळे वेळेचे नियोजन फसते. पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-ए. के. जैन, मध्य रेल्वे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी
अर्थसंकल्पात संरक्षक भिंतीसाठी तरतूद झाली आहे. तसेच संरक्षण भिंतीचा आराखडाही तयार करण्यात आला होता. आता नेमके कुठे काम अडले आहे, त्याची चौकशी करतो.
-संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका.