लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: येथील मनोरुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन केले. कामगार उपायुक्त कार्यालयाने ठेकेदाराविरोधात चार फौजदारी गुन्हे दाखल करूनही रूग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे शोषण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

ठाणे मनोरुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून काम करित आहेत. हे कामगार मनोरुग्णांची सेवा करण्याचे काम करतात. मागील ४ वर्षांपासून लोकराज्य स्वयंमरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत हे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांना चार वर्षांपूर्वी जे वेतन दिले होते, तेच वेतन त्यांना आजही दिले जात आहे. दर सहा महिन्यांनी वाढणाऱ्या विशेष भत्याची रक्कम ठेकेदार कामगारांना देत नसून ठेकेदारकडून किमान वेतन अधिनियम १९४८ चे अनुपालन केले जात नाही.

हेही वाचा… कळवा रुग्णालयातही आता बायोमेट्रीक हजेरी; कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसतो

मासिक वेतन ७ तारखेच्या आत देण्याचे कोर्टाचे आदेश असताना ठेकेदार कामगारांना कधीही वेळेवर वेतन अदा करत नाहीत. त्यांना पगार पावती दिली जात नाही. राज्य कामगार विमा योजनेची रक्कम पगारातून कपात करूनही पूर्ण रक्कम विमा कार्यालयात भरली जात नसल्याने कामगारांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. कर्मचाऱ्यांना वार्षिक भरपगारी रजा किंवा रजेचे वेतन अदा केले जात नाही. रेनकोट, गमबूट, साबण, टावेल असे सुरक्षा साहित्य दिले जात नाही, असा आरोप श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदिश खैरालिया यांनी केला आहे.

हेही वाचा… कल्याण मधील निवृत्त तिकीट तपासणीसाची शहापूरमध्ये हत्या

कामगार उपायुक्त कार्यालयाने ठेकेदाराविरोधात चार फौजदारी गुन्हे दाखल केले. तरिही रूग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे शोषण होत आहे, असा आरोपही खैरालिया यांनी केला आहे. अन्यायाविरोधात १९ जूनपासून मनोरूग्णालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सफाई कामगारांनी घेतला होता. परंतु वागळे इस्टेट पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांच्या या अडेलतट्टू भूमिकेमुळे सफाई कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याची भूमिका घेऊन त्याप्रमाणे सोमवारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, असे त्यांनी सांगितले. कायदेशीर वेतन आणि त्याची पावती द्या. वेतनातून बेकायदेशीरपणे कपात केलेली रक्कम मागील फरकासह अदा करा. वार्षिक भरपगारी रजा द्या किंवा रजेचे वेतन अदा करा. वेतन दरमाह ७ तारखेपर्यंत देण्यात यावे. वैद्यकीय उपचार व वैद्यकीय रजा प्रतिपूर्ती खर्च अदा करा. रेनकोट, गमबूट, साबण, टावेल, गणवेश अशी सुरक्षा साहित्य द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by contract employees in psychiatric hospital in thane dvr
Show comments