ठाणे : काश्मीरमध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्याविरोधात बुधवारी मुंब्रा शहरात आंदोलन करण्यात आले. ‘दहशदवाद मुर्दाबाद, दहशदवाद्यांना फाशी द्या…’ अशा घोषणा आंदोलकांनी केल्या. तसेच दहशदवाद्याचा प्रतिकात्मक पुतळा तयार करत आंदोलकांनी या पुतळ्याला फाशी दिली. त्यानंतर जोडे मारले. या आंदोलनात महिलांनीही सहभाग घेतला होता. या दहशदवाद्यांना त्यांच्या घरात शिरुन मारा अशी मागणी आंदोलकांनी केली.

काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातील विविध भागातून पर्यटक तेथे गेले होते. ठाणे जिल्ह्यातूनही ४० पर्यटक काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले. परंतु मंगळवारी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. मागील सहा वर्षांतील हा सर्वात मोठा दहशदवादी हल्ला आहे. पहेलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले.

या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये डोंबिवली येथील तिघांचा सामावेश आहे. डोंबिवली येथे राहणारे अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा या दहशदवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये अक्षरश: शोककळा पसरली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठिकाणी दहशतवादाविरोधात आंदोलन सुरु आहे.

बुधवारी मुंब्रा शहरातही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ‘दहशदवाद मुर्दाबाद, दहशदवाद्यांना फाशी द्या…’ अशा घोषणा आंदोलकांनी केल्या. तसेच फलक झळविण्यात आले. ‘दहशतवाद्यांना त्यांच्या घरात शिरुन मारा’ असा मजकूर यामध्ये होता. तसेच या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांनाही श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्याचा एक प्रतिकात्मक पुतळा तयार केला होता. या पुतळ्याला महिला आंदोलकांनी चपलेचा हार घातला. पुतळ्याला फासावर चढवून जोडे मारे मारण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सांगितले की, दहशतवादी हल्ला ज्यांनी केला. त्यांना घरात शिरून मारायला हवे. या हल्ल्यात निष्पापांचा जीव गेला आहे. दहशतवादाच्या प्रश्नावर सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा असे आंदोलकांनी सांगितले. धर्म आणि दहशतवादाचा काहीही संबंध नाही असेही आंदोलक म्हणाले.