ठाणे: ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, मलनिःसारण, यांत्रिक, घनकचरा व्यवस्थापन विभाग अशा विविध खात्यांमधील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप श्रमिक जनता संघाने केला आहे. या कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी संघाच्या वतीने शुक्रवारी पालिकेवर ‘जबाब दो- न्याय दो’ मोर्चा काढण्यात येणार आहे. जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या विविध विभागातील बारामाही सतत चालणारी अत्यावश्यक स्वरूपाची कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेतली जातात. मात्र ठेकेदार कामगारांना किमान वेतन, भत्ते आणि कायदेशीर सोयी सुविधा देखील पुरवत नाहीत. भरपगारी रजा, जादा कामाचा मोबदला देताना कामगारांची फसवणूक केली जाते. विशेष भत्त्याची रक्कम अनेक ठेकेदार नियमानुसार अदा करत नाही. गणवेश, सुरक्षा साधने, वेतन पावती देखील वारंवार मागणी करूनही देत नाही.

अनेक वर्षे सेवा करून ही कामगारांना उपदानाची रक्कम अदा केली जात नाही, असा आरोप श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केला आहे. महापालिकेची अत्यावश्यक स्वरूपाची बारामाही सतत चालणारी कामे असल्याने आणि कायमस्वरूपी कामगारांच्या सारखे काम कंत्राटी कामगार करत असल्याने ठेकेदारांना गब्बर बनवण्यापेक्षा कामगारांना कायम पदांवरील कायमस्वरूपी कामगारांच्या सारखे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा लागू करून कंत्राटी कामगारांना न्याय द्या, अशी मागणी खैरालिया यांनी केली आहे.

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी वारंवार मागणी करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने या कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी संघाच्या वतीने शुक्रवारी पालिकेवर ‘जबाब दो- न्याय दो’ मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच अशाच प्रकारे महापालिकेकडून दिली जाणारी लेव्हीची रक्कम जाते कुठे याचा खुलासा करण्याची मागणी मोर्च्यात केली जाणार आहे, असे ते म्हणाले.

विविध खात्यांचे कंत्राटी कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होणार असल्याची माहिती श्रमिक जनता संघाचे संघटक सुनील दिवेकर यांनी दिली आहे. दुपारी ३ वाजता तलावपाली चिंतामणी चौक येथून निघणाऱ्या मोर्च्याला पाठींबा देण्यासाठी ठाण्यातील न्यायप्रिय संस्था संघटनांचे कार्यकर्ते नेते आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन संघाने केले आहे.