ठाणे : राज्य सरकारचा अंत्यय बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे -बोरीवली भुयारी मार्गाविरोधात आज, शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी मूक आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भुयारी मार्गिकेसंदर्भात संदिग्ध उत्तरे देऊन नागरिकांची दिशाभूल केली. तसेच अनेक जुन्या वृक्षांची छाटणी केली. त्यामुळे हे मूक आंदोलन करण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणमध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्गसंपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली. सुमारे १२ हजार नागरिक या भागात वास्तव्य करत आहेत. याच भागात एमएमआरडीएकडून ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. ठाणे शहरातून बोरीवली १५ मिनीटांत गाठण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे. परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एमएमआरडीएने या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत.
या विरोधात येथील रहिवाशांची एमएमआरडीएसोबत एक बैठक झाली होती. ठाणे-बोरीवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. तसेच येथे छाटणी केलेल्या वृक्षांचे पूनर्रोपण संकुलाच्या आवारात करावे अशी मागणी देखील केली होती. परंतु त्यास एमएमआरडीएने कोणताही प्रतिसाद दिला नाही. रातोरात येथील वृक्ष छाटण्यात आल्याचा आरोपही रहिवाशांचा आहे. या भुयारी मार्गासाठी गृहसंकुला लगतच्या रस्त्यावर टोलनाका देखील उभारण्यात येणार आहे. हा टोलनाका मुल्लाबाग बस आगाराजवळ हलविण्याची मागणी देखील रहिवाशांची आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी येथील रहिवाशांनी मूक आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
ठाणे बोरीवली भुयारी मार्गासंदर्भात एमएमआरडीएने नागरिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आम्ही मूक आंदोलन करुन एमएमआरडीएला जाब विचारणार आहोत अशी माहिती रहिवासी डाॅ. लतिका भानुशाली आणि नितीन सिंग यांनी सांगितले. ठाण्यातील म्युज या स्वयंसेवी संस्थेने देखील ठाणे बोरीवली भुयारी मार्ग, घोडबंदर रुंदीकरण, साकेत आनंदनगर उन्नत मार्गासाठी होणाऱ्या वृक्ष तोडीविरोधात आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मानपाडा चौकात सायंकाळी ४ वाजता होणार आहे.