तुम्ही बटाटय़ापासून फार फार तर वडा बनवू शकता. नाही तर एखादा जंबोवडा किंवा वडय़ाचे पूर्वीचे प्रसिद्ध असलेले प्रकार; पण ठाण्यातील पराग मालुसरे या तरुणाने वडीपाव नावाचा एक वेगळाच पदार्थ शोधून काढला आहे. रोजचेच जिन्नस वापरून काही तरी वेगळे करण्याचा हा प्रकार वाखाणण्याजोगा आहे. वैशिष्टय़पूर्ण चटणीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या या वडीची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. तरुणाई या वडीच्या प्रेमात आहे. या नव्या पदार्थाला कॉर्पोरेट विश्वातही बरीच मागणी असल्याचे पराग मालुसरे सांगतात.

ठाण्यात वडापावचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. दर पाच मैलांवर जशी भाषा बदलते, तशीच प्रत्येक नाक्यावर मिळणाऱ्या वडय़ाची चवही. चवींच्या बाबतीत बरीच विविधता असलेल्या ठाण्यात आता बटाटावडी हा नवा प्रकार खवय्यांच्या सेवेत हजर झाला आहे. गोखले रोडवर मल्हार सिनेमागृहाजवळील व्होडाफोन गॅलरीला लागूनच असलेल्या ‘पृथ फास्ट फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडय़ाची ही बहीण आपल्याला भेटते. गेली तीन दशके ठाण्यात राहणाऱ्या पराग मालुसरे यांनी ‘वडीपाव’ हा नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ तयार करण्याचा प्रयोग केला. या पदार्थाचा जन्म अवघ्या तीन महिन्यांपूर्वीचा. जुलै महिन्यात त्यांनी बटाटावडी तयार केली. या बटाटावडीचे एकूण तीन प्रकार आहेत. साधी वडीपाव, चीज वडीपाव आणि मायोचीज वडीपाव. यात साधी वडी हा प्रकार अवघ्या १५ रुपयांमध्ये मिळतो. लादी पावामध्ये त्यांची विशिष्ट चटणी आणि बटाटय़ाचे मिश्रण असते. त्यामुळे त्याची चवही वेगळी असते. चीज वडीपाव हा साध्या वडीसारखाच प्रकार असून त्यात दोन्ही बाजूंनी शेजवान चटणी लावण्यात येते. यातही त्यांची विशिष्ट चटणी आणि चीज टाकण्यात येते. याची किंमत २५ रुपये आहे. तिसरा प्रकार मायोचीज वडीपाव आहे. त्यात मायोचीज टाकण्यात येते. याची किंमतही अवघी ३० रुपये आहे. या तिन्हीही पदार्थाना लालसर रंग येईपर्यंत ग्रिल्ड करण्यात येते. तरुणांना सतत काही तरी नवीन आणि चमचमीत हवे असते. त्यांच्यासाठी हा एकदम छान पर्याय आहे.

जेव्हा आम्ही नव्याने हे दुकान सुरू केले, त्या वेळी दिवसाला २० ते २५ वडीपाव विकल्या जात होत्या. पुढे त्याची कीर्ती वाढत गेली. आता दर दिवशी ७० ते ८० वडय़ा विकल्या जात असल्याचे पराग यांनी सांगितले. एका ग्राहकाचा अनुभव सांगताना पराग म्हणाले, एकदा एक आजी-आजोबा आणि त्यांचा चार वर्षांचा नातू व्होडाफोन गॅलरीत आले होते. तेव्हा तो नातू घरात नीट जेवत नसल्याचे त्या आजीने गप्पा मारताना सांगितले. मी त्या आजीला एक वडी त्यांच्या नातवाला भरविण्यास सांगितली. त्याने एक वडी खाल्ल्यानंतर चक्क दोन वडय़ा आणखी घेतल्या. आताही त्याचे वडील कोपरीहून दररोज वडीपाव घेण्यासाठी येतात. वडीपावव्यतिरिक्त या पृथ फास्ट फूड कॉर्नरवर ‘चिलीमिली’ नावाच्या सँडविचलाही प्रचंड मागणी आहे. वेगवेगळ्या भाज्या, कांदा, काकडी टाकून हे सँडविच बनविले जाते. याचीही चव इतर सँडविचपेक्षा वेगळी असल्याचे पराग यांनी सांगितले. नौपाडा येथील अनेक कॉर्पोरेट सेक्टर कंपनीत परागच्या वडय़ांना भलतीच मागणी आहे. तुमचे घर नौपाडा किंवा पाचपाखाडी भागात असेल तर हा पदार्थ फ्री होम डिलिव्हरी सेवेतही उपलब्ध असल्याचेही पराग यांनी सांगितले.

पृथ फास्ट फूड सेंटर

  • कुठे?- गोखले रोड, मल्हार सिनेमागृहासमोर, ठाणे (प).

Story img Loader