ठाणे : भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) राजेश डोंगरे (३४) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) १० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले आहे. हत्येच्या प्रयत्ना प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी करू नये यासाठी त्याने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेश डोंगरे विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोनगाव पोलीस ठाण्यात राजेश डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्ना प्रकरणात एक गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील एकाला आरोपी करु नये यासाठी डोंगरे याने त्यांच्याकडून ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. अखेर त्यांनी याप्रकरणी तक्रार देण्यासाठी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी राजेश डोंगरे याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, डोंगरे याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राजेश डोंगरे याला १० हजार रुपये घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणाची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ठाणे, कोकण पट्ट्यात मागील वर्षभरात लाचखोरीमध्ये सर्वाधिक कारवाई पोलिसांवर झाली आहे. ठाणे लाचलुपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रचलेल्या सापळ्यांमध्ये ठाण्यासह कोकण क्षेत्रातील २१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सापळ्यात अडकले होते. त्यापाठोपाठ महसूल, पालिकेतील कर्मचाऱ्यांचेही लाच घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. लाच घेणे आणि देणे दोन्ही गुन्हे असतानाही ठाणे, पालघर आणि तळ कोकणामध्ये लाचेचा विळखा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घट्ट पकडला आहे. त्यातही लाच घेण्यामध्ये पोलीस अव्वल ठरल्याचे कारवाईतून आढळून आले आहे.
कारवाई टाळण्यासाठी, जामीन मिळवून देणे, अटक करु नये अशा विविध कारणांसाठी पोलिसांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे. २०२४ मध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण ६६ सापळे रचले होते. त्यामध्ये ९८ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले. या सापळ्यांमध्ये सर्वाधिक कारवाया पोलिसांविरोधात झाल्या आहेत. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड-अलिबाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा भाग येतो. या क्षेत्रांत ग्रामीण आणि शहरी पोलीस असा दोन्ही भाग येतो. विभागाच्या कारवाईत एकूण २१ पोलिसांवर लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले.