ठाणे : महाराष्ट्रात सर्वाधिक बासरीवादक ठाण्यात असून ठाणे ही सुरेल नगरी असल्याचे वक्तव्य पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ठाण्यात बोलताना केले. ठाण्यातील गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित स्वर प्रभात या कार्यक्रमात ते बोलत होते. विवेक सोनार लिखित पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचा अंतर्भाव नवीन शैक्षणिक वर्षापासून पश्चिम बंगालच्या शंभर शाळांमध्ये होणार आहे.

रसिकप्रेमींसाठी ठाण्यात स्वर प्रभात कार्यक्रमाचे दुसरे पर्व ठाण्यातील टाऊन हॉल ॲम्पिथिएटर येथे पार पडले. ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट आणि पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शास्त्रीय गायन आणि सामूहिक बासरी वादनाचे सूर निनादले. यावेळी बोलताना, पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक बासरीवादक ठाण्यात आहेत. माझा ज्येष्ठ शिष्य विवेक सोनार याच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बासरी वादक पं. विवेक सोनार यांच्या युवराज सोनार, डॉ. हिमांशू गिंडे, प्रशांत बानिया, सतेज करंदीकर आणि रितेश भालेराव या ज्येष्ठ शिष्यांनी राग अहीर भैरव सादर करत सुरेल सुरूवात केली. रोहित देव याने त्यांना तबला साथ केली. ठाण्यातील ज्येष्ठ गायक पं. सुरेश बापट यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग कोमल रिषभ आसावरी आणि राग ललत सादर केले. त्यांनी रसिकांची मने जिंकली. हार्मोनियम साथ अनंत जोशी, तर तबला साथ सुहास चितळे यांनी केली. या कार्यक्रमात देशातील आठ संगीत साधक विद्यार्थ्यांना एकूण पाच लाखांची शिष्यवृत्ती यावेळी देण्यात आली.

शास्त्रीय संगीतासाठी इतके मोठे काम होत आहे. मी विवेकचा सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. अशा चळवळींचा ठाणे महापालिका नेहमीच मदत करत राहील. कलाकारांच्या पाठिशी उभी राहील अशा शब्दांत ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.