कल्याण येथील अपघातानंतर गाडी-फलाट अंतर कमी करण्याची मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी आणि फलाटामधील अंतर कमी केल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा पोकळ असल्याचे कल्याण स्थानकात दिसून येत आहे. फलाट क्रमांक चार आणि पाचवर अनेक ठिकाणी अजूनही दीड फुटांपेक्षा मोठी जीवघेणी पोकळी कायम असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अशाच पोकळीत पडून गेल्या आठवडय़ात पुण्याची सायली ढमढरे ही मुलगी जायबंदी झाली होती. या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर कल्याण-कर्जत-कसारा प्रवासी संघटनांनी कल्याण स्थानकातील गाडी आणि फलाटामधील अंतर मोजले कल्याण स्थानकात ट्रेन आणि फलाटामधील अंतर १४ ते १८ इंच इतके मोठे असल्याचे यावेळी दिसून आले. हे अंतर ७ ते ९ इंचापेक्षा अधिक असता कामा नये, अशी नियमावली आहे.

कल्याण स्थानकात गेल्या वर्षभरापासून फलाटाची उंची वाढवण्यात येत आहे. फलाट क्रमांक सहा आणि सातवर मोठय़ा प्रमाणात कामे केली जात असली तरी अन्य फलाटांवरील परिस्थिती अधिक गंभीर आहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून या भागात अंतर योग्य असल्याचा दावा केला जात आहे.

सायली ढमढेरेच्या अपघातामुळे हा दावा फोल असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठवडय़ात आयएएस होण्याचे स्वप्न बाळगून पुण्यावरून कल्याणमध्ये आलेल्या सायली ढमढेरेचा इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढताना अपघात झाला. तिच्यावर उपचार सुरू असले तरी या अपघातात तिला पाय गमावावे लागले आहेत.

या पाश्र्वभूमीवर प्रवासी संघटनांनी मंगळवारी सकाळी स्थानकातील गाडी आणि फलांमधील अंतराची नोंद घेतली. यावेळी हे अंतर काही ठिकाणी दीड फुटापर्यंत असल्याचे दिसून

आले. यावेळी कल्याण, कसारा आणि कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, सचिव श्याम उबाळे यांच्यासह प्रवासी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासन, सुरक्षा दल आणि पोलिसांना पत्र देऊन यावर उपाय योजण्याची विनंती केली आहे.

प्रवासी संघटनांची निरीक्षणे..      

* अपघाताच्या ठिकाणी फलाटाची उंची १४ ते १८ इंच इतकी मोठी आहे. हे अंतर कमाल ७ ते ९ इंचापेक्षा जास्त असू नये असे निमावली सांगते.

* अनेक फलाटांवर सुरक्षा दल, पोलीस यंत्रणांचे अधिकारी किंवा कर्मचारी नसल्यामुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळत नाही.

* फलाट क्रमांक एक आणि एक ए मध्ये हे अंतर अधिक आहे.

* लोकलपेक्षा मेल गाडय़ा आणि फलाटांमधील अंतर अधिक आहे.

* मेल गाडय़ांमधून पडल्यामुळे होणारे अपघात जीवघेणे ठरत आहेत.

कल्याण रेल्वे स्थानकात होणारे अपघात गंभीर असून त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे. वारंवार याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे व्यापक आंदोलन उभारण्याची गरज आहे. पुढील काळात रेल्वे प्रशासनाने याविषयी कारवाई केली नाही तर व्यापक जनआंदोलन उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. कल्याण-कसारा आणि कर्जत या स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून रेल्वे प्रशासनाकडे गाडी आणि फलाटातील अंतर कमी करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

– राजेश घनगाव, रेल्वे प्रवासी संघटना

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public demand to reduce train platform gap after accident in kalyan